Jump to content

पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/409

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३९५] होईल. म्हणजे आतां अ देशांत फक्त कापड होईल व तेथें मजुरीचा दर ६ शिलिंग होईल. ब देशांत फक्त गहूं होईल व तेथें मजुरीचा दर ३ शिलिंग ४ पेन्स होईल; अर्थात् मजुरीच्या मानानें पाहतां अ देशाला गहूं स्वस्त मिळाला व ब देशाला कापड पहिल्यापेक्षां स्वस्त मिळाले.

   वरील काल्पनिक दाखल्यावरून बहिर्व्यापाराचा फायदा कसा होतो व सामान्यतः तो दोन्ही देशांत कसा वांटला जातो हें दिसून येईल. बहिर्व्यापारापासून दोन देशांस फायदा होण्यास एकच अट असते ती ही कीं, त्या दोन देशांमध्यें पदार्थाच्या उत्पत्तिव्यायामध्यें  सापेक्ष तरी भेद असावा. एका देशामध्यें दुस-या देशापेक्षां दोन्ही पदार्थ उत्पन्न करण्याची जास्त सोय असली तरी पण दुस-या देशांत जे पदार्थ उत्पन्न करणें जास्त अडचणीचें आहे तो माल पहिल्यानेंच उत्पन्न करून दुस-या देशाला पुरविणें हें दोन्ही देशांच्या फायद्याचें असतें. तसेंच, दुसया देशानें जो माल उत्पन्न करण्यांत आपल्याला-सापेक्ष का होईना-परंतु कमी अडचण आहे तो मालच करण्यांत, व बाकीचा माल दुस-या देशाकडून विकत घेण्यांत, त्या देशाचा फायदा आहे. अशा व्यापारानें दोन्ही देशांतील उत्पादक साधनाची शक्य तितकी कार्यक्षमता वाढते व या कार्यक्षमतेच्या वाढीनें दोन्ही देशांतील बहुजनसमाजाची उपभोगक्षमताही वाढते.
   आतां या काल्पनिक उदाहरणाला प्रत्यक्ष कोटीमध्यें आणून सोडावयाचें म्हणजे या काल्पनिक दाखल्याच्या गृहीत मर्यादा काढून टाकणें होय. अर्थात् प्रत्यक्ष व्यापारांत दोनच वस्तू नसतात तर प्रत्येक देश पुष्कळ माल तयार करतो व यापैकीं ब-याच मालाची बहिर्व्यापारांत अदलाबदल होते; तसेंच व्यापार दोनच देशांमध्यें न चालतांना एकसमयावच्छेदेंकरून पुष्कळ देशांशीं व अर्वाचीन सर्व जगाशीं चालतो; तसेच निरानराळ्या देशांत निरनिराळ्या चलनपद्धति असतात; शिवाय मालाची नेआण करणें हें कमी आधक खर्चाचें काम असतें व एका देशांतून दुस-या देशांत भांडवल व मजूर हे अगदीच जात नाहीत असें नाही. या सर्व गोष्टींचा एकसमयावच्छेदेंकरून अन्तर्भाव केला म्हणजे बहिर्व्यापाराच्या प्रश्नाचा गहनपणा ध्यानांत येतो. परंतु काल्पनिक दाखल्यांत समाविष्ट झालेल्या तत्वांत फरक होत नाही. प्रश्न मात्र बराच भानगडीचा होतो इतकेंच. शेवटीं बहिर्व्यापाराचे तत्व म्हणजे सापेक्ष सोयीचेंच राहतें.बहिर्व्यापाराचा फायदा म्हणजे