Jump to content

पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/402

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३९० ] दरवर्षीं पाठवीत असे व आफ्रिकेच्या किना-याच्या प्रदेशाच्या शोधाचें सर्व श्रेय या खटाटोपीस आहे. शेवटीं वास्कोदिगामा याच पोर्तुगीज गृहस्थाला हिंदुस्थानचा जलमार्ग शोधून काढण्याचें श्रेय मिळालें, तसेंच स्पेन देशाच्या कोलंबसास अमेरिकेच्या शोधाचें श्रेय मिळालें हैं सर्वश्रुत आहे. इंग्लंड, हॉलंड, फ्रान्स वैगैरे देशांनीं मागाहून या शोधापासून आपला विलक्षण फायदा करून घेतला ही गोष्ट निराळी. युरोपाच्या संपत्तीची वाढ या शोधापासून झाल्यामुळे सर्व युरोपमध्यें एका काळीं अंतर्व्यापारापेक्षा बहिर्व्यापराला फार महत्व दिलें जात असे तें कां याचा खुलासा होईल. शिवाय अर्थशास्त्राला व्यवस्थित स्वरूप येऊन त्यामध्यें जो उदीम पंथ उदयास आला त्या पंथानें पैशाला फार महत्व दिलें व ज्या देशामध्यें सोन्यारुप्याच्या खाणी नाहींत त्या देशांत सोनें-रुपें आणण्याचें साधन म्हणजे बहिर्व्यापार होय अशी समजूत असल्यामुळे या बहिर्व्यापारापासून देशामध्यें जास्त पैसा येईल असें धोरण ठेवणें हें सरकारचें काम आहे असा समज झाला व यामुळे या व्यापाराचा सरकारशीं निकट संबंध पहिल्यापासून आलेला आहे. असो.

   अंतर्व्यापार व बहिर्व्यापार यांमधला भेद सहज ध्यानांत येण्यासारखा आहे. एका राजकीय अंमलाखालील देशामधला अन्तर्गत व्यापार अंतर्व्यापार होय व एका देशाचा दुस-या देशाशीं व्यापार हा बहिर्व्यापार अगर अंतर्राष्ट्रीय व्यापार होय. परंतु राजकीय अंमलाचा भेद हा अर्थशास्त्रविषयक भेद नाहीं व म्हणून अर्थशास्त्रदृष्टया या दोन व्यापारांत काय भेद अहे असा प्रश्न निघतो. परंतु असा अर्थशास्त्रदृष्ट्याही फरक दाखविलेला आहे. तो हा:-अंतर्व्यापारामध्यें पूर्ण चढाओढीचें प्राबल्य असतें. देशामध्यें भांडवल व श्रम या दोहोंमध्ये चलनक्षमता फार असते. म्हणजे देशांत ज्या धंद्यांत किफाईत जास्त आहे तिकडे भांडवल जातें; तसेंच जेथें मजुरी जास्त मिळते तेथेच मजूर जातो यामुळे देशामध्यें नफा व मजुरी यांचे सामान्य दर एकच होण्याकडे कल असतो व मालाचें मोल हें यामुळेंच  उत्पादनव्ययाच्या मर्यादेच्या वर फारसें जाऊं शकत नाही. परंतु  बहिर्व्यापाराला या गोष्टी फारशा लागू नसतात.एका देशांतून दुसऱ्या देशांत मजूर किंवा भांडवल फारसें जाऊं शकत नाहीं;कारण या जाण्यास प्रथमतः दळणवळणाच्या साधनांची अडचण, देश-