Jump to content

पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/345

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३३३] यामुळें व्दिचलनाच्याें योजनेला आतां व्यावहारिक महत्व राहिलें नाहीं हें खरें आहे. तरी सुद्धां या योजनेच्या व व्दिचलनपद्धतीच्या स्वरूपाचें तात्विकदृष्ट्या महत्व कमी होत नाहीं. या वादावरून पैशाच्या स्वरूपाचें व त्याच्या कार्यभागाचें स्पष्टीकरण होत असल्यामुळें त्याचा विचार करणें इष्ट आहे. तेव्हां व्दिचलनाचें खरें स्वरूप काय व त्यां पद्धतीचे अंगीं सर्व जगांतील चलनपद्धति बनण्यासारखे कोणते गुण आहेत हें प्रथमतः पाहिलें पाहिजे व मग अशा पद्धतीचा सार्वत्रिक स्वीकार होण्यास काय अडचणी होत्या व जगांतील चलनपद्धतीला कोणतें वळण लागलें व तें कां लागलें या गोष्टीचा विचार करण्यास ठीक पडेल. द्विचलनपद्धतीचें सारसर्वस्व ह्राणजे पैशाच्या कामाकरितां सोनें व रुपें यांना प्रत्येक बाबींत सारख्या द्र्ज्यावर आणून ठेवणें हें होय. यापासून खालील गोष्टी निष्पक्ष होतात. पहिली-खासगी व्यक्तीनीं कोणतीही धातु टांकसाळीमध्यें आणून दिली असतां त्या धातूचीं अमर्याद परिमाणांत नाणीं पाडून मिळालीं पाहिजेत. याचा अर्थ सोनें देऊन रुप्याचीं नाणीं मिळालीं पाहिजेत किंवा रुपें देऊन सोन्याचीं नाणीं मिळालीं पाहिजेत असा मात्र नाहीं. तसेंच नाणीं पाडण्याबद्दल कमिशन घेतलें जाणार नाहीं असाही त्याचा अर्थ नाहीं. अमर्याद परिमाणाचा अर्थ हा कीं, दोन्ही धातूंचीं नाणीं मुख्य नाणीं समजलीं जातात. एक मुख्य व गौण असा त्यांत भेद नसतो. दुसरी-दाेन्हीं धातू कायदेशीर फेडीची चलनें पाहिजेत; व कर्जदाराच्या खुषीप्रमाणें वाटेल त्या धातुचीं वाटतील तितकीं नाणीं देण्याचा आधिकार त्यास पाहिजे. अर्थात दोन्ही नाणीं मुख्य पैसा झालीं. या पद्धतींतहीउपपैसे असण्यास हरकत नाहीं. परंतु येथें दोन धातू या मोलाच्या परिमाणभूत मानल्या जातात. प्रत्येक माणसाला बँकेला किंवा सरकारला वाटेल त्या धातूच्या नाण्यांत पैशाची भरपाई करण्याची मुभा असते. तिसरी-द्विचलन पद्धतींत सरकार दोन धातूंमधील विनिमयाचें प्रमाण कायघानें ठरवितें. ही गाेष्ट कायदेशीर चलन या कल्पनेपासून आपोआप निष्पन्न होते. जर कर्जदाराला कोणत्याही धातूच्या नाण्यांत कर्ज फेडण्याची मुभा आहे तर एका नाण्यार्शीं दुस-या नाण्याचें प्रमाण कायघानेंच ठरविलें पाहिजे हें उघड आहे. या पद्धतींत एक पौंड ह्राणजे