Jump to content

पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/256

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[२४४] सुचावण्यांत आले व तत्संबंधीं जे प्रयत्न झाले त्यासंबंधींची मीमांसा करून त्यांचें समर्थन करणारा पक्ष म्हणजे सामाजिक पंथ होय; मग हे ‘फेरफार घडवून आणण्याचे मार्ग कोणतेही असोत. ते खासगी व्यक्तींच्या परोपकारबुद्धीचे व आपखुषीचे असोत; किंवा सरकारी कायद्याचे असोत; किंवा संपत्तीच्या उत्पत्तीच्या पद्धतींत बदल करण्याचे असोत; किंवा क्रांतिकारक तऱ्हेचे असोत. अशा व्यापक अर्थानें सामाजिक पंथ व सामाजिक पंथी चळवळी या शब्दांचा प्रयोग केला म्हणजे त्याचे प्रथमतः दोन वर्गे होतात. पाहिला वर्ग-शांतिमूलक सामाजिक पंथी चळवळींचा व दुसरा वर्ग क्रांतिमूलक सामाजिक पंथी चळवळींचा. पहिल्या वर्गांतील सर्व चळवळींना समाजांतील संपत्तीच्या वांटणींतील असमता काढून टाकावयाची असते खरी; पण ती शांततेच्या व कायदेशीर मार्गांनी काढून टाकावयाची असते. या पहिल्या वर्गाचें चार पोटभेद होतात; त्यांचीं नांवें अशीः-व्याक्तिक सामाजिक पंथ, राष्ट्रीय सामाजिक पंथ, समाईक सामाजिक पंथ व संयुक्त सामाजिक पंथ. क्रांतिकारक सामाजिक पंथाचे अराजक पंथ व विध्वंसक पंथ असे दोन पोटभेद होतात. हें वर्गीकरण खालील कोष्टकावरून चट्कन ध्यानांत येईल.

             सामाजिक पंथ 

शांतिमूलक क्रांतिमूलक व्यक्तिय राष्ट्रीय समाईक संयुक्त अराजक विध्वंसक या सहा पोटभेदांपैकीं शेवटचे दोन पोटभेद सामाजिक पंथाचे पोटभेद मानावे किंवा नाहीं याबद्दल मतभेद होण्याचा संभव आहे. कारण अराजकपंथ व विध्वंसकपंथ या दोघांच्या मतें एकंदर समाजव्यवस्थाच मुळीं मनुष्याच्या हिताच्या विरुद्ध आहे. समाज व त्यांतील सरकार हेंच मुळीं सर्व दुःखांचें मूळ आहे व हें मूळ नाहीसें होऊन सर्व मनुष्यांना स्वाभाविक स्वातंत्र्य मिळालें म्हणजे मनुष्यजातीस सुखप्राति होईल; अर्थात् समाजही एक कृत्रिम गोष्ट आहे व ती मनुष्याच्या दास्यत्वाला व