Jump to content

पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१७०]

 हिंदुस्थानांत व्याजाबद्दल कांहीं एक धर्मबंधन नव्हतें. यामुळे व्याज घेण्याची पद्धति व व्याजबट्टा करणा-याचा धंदा फार काळापासून येथें प्रचारांत आहे. मात्र हा धंदा समाजांतील वरिष्ट जात जां ब्राह्मण तिनें करूं नये असा सक्त नियम असे. ब्राह्मणानें कसीदं म्हणजे व्याजबट्टा करणें हें मोठे पाप आहे अशा प्रकारचीं स्मृतिवचनें सांपडतात. परंतु वैश्य जातीस हा धंदा करण्याची पूर्ण मुभा होती. परंतु हिंदुस्थानांत अन्तःस्वास्थ्य किंवा जीविताची व मालमत्तेची सुराक्षितता फारशी नसल्यामुळे, तसंच अंदाधुंदीच्या काळांत न्यायाची पद्धतही चांगलीशी अमलांत नसल्यामुळे शिल्लक पैसा पुरून ठेवण्याचा परिपाठ फार होता. यामुळे भांडवलाची फार दुर्मिळता असे व ह्राणूनच व्याजाचा दरही फार असे. पेशवाईंतील रोजनिशा–ज्या हल्ली प्रसिद्ध होत आहेत-त्यांवरुन पेशव्यांनासुद्धां रोकडा १२ पासून २५ पर्यंत व्याज द्यावें लागे असें दिसतें. परंतु या पेशवाईंतील माहितीवरूनही व्याजाच्या उपरेि निर्दिष्ट तत्वाचेंच समर्थन होतें. जसजसे देशांतील सरकार बद्धमूल होतें व त्यावर लोकांचा विश्वास बसतो तसतसें सरकारला व्याज कमी कमी द्यावें लागतें. पहिल्या बाजीरावास दरमहा दरशेंकडा २ रुपयांनीं कर्ज काढावें लागलें; तेंच पुढें नानासाहेबांच्या कारकीर्दींत १॥ रुपयार्न कर्ज मिळू लागलें व सवाई माधवरावांच्या कारकीर्दीमध्यें दरमहा दरशेंकडा १ रुपयाचा व्याजाचा दर झाला होता. यावरून व्याजाचा दर सावकाशपणें पण कमीकमी होत चालला होता असें दिसतें.
 सरकारची जर ही स्थिति तर खासगी व्यक्तींना किती तरी व्याज द्यावे लागत असलें पाहिजे हें उघड आहे. परंतु इंग्रजी अमलापासून पैसे पुरून ठेवुण्वाची पद्धती जात चालली आहे; अजूनही आमच्या पुराणप्रियतेमुळें आह्मीं ती अजिबात साइन दिली नाहीं हें मागें एके ठिकाणीं सांगितलें आहे. यामुळे व्याजाचा दर कमी कमी होत चालला आहे. तरी पण अजून गरीब शेतक-यांना जबर व्याज द्यावे लागतें व अशा गरीब लोकांची पत वाढविण्याकरितांच सहकारी पेढ्या काढण्याचा हल्लीं चालू झाला आहे. त्याची हकीकत दुस-या एका भागांत द्यावयाची आहे म्हणून त्याचा येथें उल्लेख करण्याची जरूरी नाहीं.
 वरील विवेचनावरून असें दिसून येईल कीं, व्याज या उत्पन्नाच्या