पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/236

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पोर्तुगाल, फ्रान्सनी सांगितले की आम्ही राष्ट्रसंघात हैदराबादला पाठिंबा द्यायला तयार आहोत. त्या वेळी प्रश्न राष्ट्रसंघात चर्चेला घ्यावा की नाही यासाठी तेरा मतांचा पाठिंबा लागत असे. समजा हैदराबादला एवढा पाठिंबा मिळाला तर अशा अवस्थेत भारताची भूमिका काय? वल्लभभाईंनी सांगितले, निरनिराळे जमीनदार त्यांच्या जमीनदारीचे उच्चाटन करताच राष्ट्रसंघात जातो असे म्हणू लागले आहेत. भारत कोणत्याही जमीनदाराला राष्ट्रसंघात जाण्याची परवानगी देणार नाही. निजाम हा एक मोठा जमीनदार असेच आम्ही मानतो, संस्थानिक मानतच नाही. या वेळी हे उघडच झाले की लष्करी कारवाई होणार. त्याचबरोबर हैदराबादहून तारांनी सुरुवात झाली की, इकडे सर्व शांतता आहे. शेवटच्या महिन्यात ज्या तारा गेल्या त्यांत दहा हजार तारा हिंदूंच्या आहेत. शेवटी निजामाला अंतिमोत्तर देण्यात आले की, चोवीस तासांच्या आत तुम्ही अमुक गोष्ट करा, नाहीतर भारतीय फौजा संस्थानात घुसतील.

 तेरा सप्टेंबर अठेचाळीसला भारतीय फौजा हैदराबादच्या सरहद्दीत घुसल्या.

 हैदराबाद संपू नये, निजाम संपू नये, शरणागती झाल्याच्या नंतर नव्या शांततेच्या वातावरणात भारत आणि निजाम यांच्या वाटाघाटी विलीनीकरणासाठी सुरू व्हाव्या अशी कन्हैयालाल मुन्शींची इच्छा होती. या दृष्टीने त्यांनी पावले टाकायला सुरूवात केली तेव्हा त्यांना बडतर्फ करून परत घेतले. मुन्शींनी त्यांच्या पुस्तकात मूळ तारच उद्धृत केलेली आहे. त्यात मुन्शींना पुढील आज्ञा आहेत : यापुढे आपण कोणत्याच चर्चा करू नयेत. कोणत्याही रीतीने आश्वासने देऊ नयेत. तुमचे काम संपले आहे. तुम्ही गप्प बसावे. शरणागतीचा समारंभ लष्करी आहे. त्याला तुम्ही हजर राहता कामा नये. तुमची प्रकृती बरी नसल्यामुळे तुम्हाला दिल्लीला नेण्यासाठी विमान येत आहे, इत्यादी. ही तार जवाहरलाल नेहरूंची आहे. या तारेचा अर्थ स्पष्टच आहे.

 आणखी नेहरूंची एक तार स्वामीजींना आहे, ती अशी : तुम्ही तुरुंगातून सुटलात, अभिनंदन, माझ्याशी चर्चा केल्याशिवाय कोणत्याही प्रश्नावर मत देऊ नये. फक्त लोकांना शांततेचा विचार समजावून सांगावा.

 हा जो मुद्दा आहे तो असा. पोलिसी कारवाईत हैदराबाद संपले. यापुढे हैदराबाद नाही. निजाम नाही. मंत्रिमंडळ नाही, वाटाघाटी नाहीत. नव्या वाटाघाटी नाहीत ही नाजूक बाब, सर्वांच्या लक्षात येईल असे नाही. कोणीतरी पटकन असे म्हणेल की निजाम सरकारने जे उपद्व्याप केले, त्याचे गंभीर परिणाम त्याने भोगले.

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२३८