पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/231

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सरकार करीत होते. हिंदुस्थान सरकारची मान्यता मिळवी: असा प्रयत्न अलियावर जंग करीत होते. काँग्रेसची मान्यता मिळावी असा प्रयत्न कन्हैयालाल मुन्शी करीत होते. तोवर धूर्त निजामाने आणखी एक पिल्लू सोडून दिले होते. इथपर्यंत आलोच आहोत तर आपणाला ब्रिटिश कॉमनवेल्थचा सभासद व्हायला मान्यता मिळावी. वा रे वा धूर्त निजाम! म्हणजे हैदराबादला ब्रिटिश कॉमनवेल्थचे सभासदत्वही मिळाले; पाकिस्तान-भारत असे युद्ध झाले तर तटस्थ राहण्याचा अधिकारही मिळाला आणि इंग्लंड व भारत यांचे फाटले व भारत कॉमनवेल्थमून बाहेर पडला तर हैदराबादला भारतातून बाहेर पडण्याचा संभव मिळाला. निजाम हे धाडस करतो कारण त्याला माऊंटबॅटन यांची सहानुभूती मिळणार ही त्याची खात्री; कारण माऊंटबॅटन इंग्रज. याला ब्रिटिश सरकारचीही सहानुभूती असणार, कारण ते सारे इंग्रज. इंग्रजांची सहानुभूती आपल्याच बाजूला राहील याची काळजी निजामाने घेतलेली. म्हणून हैदराबादचा प्रश्न इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये तीन दिवस चर्चिला गेला. हैदराबादचे स्वातंत्र्य जतन करण्याच्या दृष्टीने ब्रिटिश सरकारने पावले टाकावी अशी मागणी विरोधी पक्षाचे नेते चर्चिल यांनी केली. पण ॲटलींनी जे प्रश्न विचारले त्यांना चर्चिलजवळ उत्तर नव्हते. नेहरू हे अतिशय धूर्त राजकारणी व मुत्सद्दी होते हे मी पहिल्या व्याख्यानात सांगितले. स्वातंत्र्याचा कायदा होत असतानाच पंडित नेहरूंनी सर्व सावधगिरी आधीच घेऊन ठेवलेली होती. ती अशी - इंग्रजांचे राज्य संपून भारत आणि पाकिस्तान अशी दोन नवी राष्ट्र निर्माण होत आहेत हे त्यांनी नाकारले. नवे निर्माण होत आहे ते फक्त पाकिस्तान. तेही ब्रिटिश इंडियाचा काही भाग वेगळा होऊन. ब्रिटिश इंडियाची इतर सर्व वारसदारी ज्याच्याकडे येऊन पोहोचते असे भारत हे राष्ट्र पूर्वापार चालते आहे. नेहरूंची ही भूमिका प्रतिगामी मानली गेली. नवीन भारत निर्माण झाला असे नेहरू मानीतच नाहीत. जुन्या ब्रिटिश सरकारच्या पाकिस्तान सोडून उरलेल्या सर्व वारशाचे ' वारसदार जुने भारत आहे, अशी नेहरूंची भूमिका. त्या भूमिकेला चर्चिलने मान्यता दिलेली. कारण इंग्लंडच्या प्रथेप्रमाणे नवा कायदा बनताना विरोधी पक्षनेत्याचा सल्ला घेतला जात असे. तिथे आजच्या भारतासारखे नाही. इथल्या आजच्या पंतप्रधान स्वतःच्या मंत्रिमंडळालाही न विचारता कामे करतात, तिथे विरोधी पक्षाचे काय? इंग्लंडमध्ये विरोधी पक्षनेत्याला विचारले जाते. चर्चिलला विचारले गेले होते व त्याने संमती दिली होती. ॲटलीने चर्चिलला विचारले, जुन्या ब्रिटिश सरकारचे सर्व संस्थानांवर

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२३३