पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/206

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आंदोलनाला तोंड द्यावयाची निजामाची तयारी नव्हती. म्हणून मिर्झा इस्माईल यांना पंतप्रधान म्हणून बोलावण्यात आले आणि ते कामावर रुजू होण्याआधी एक महिना, जुलै शेचाळीसला संस्थानी काँग्रेसवरची बंदी उठविण्यात आली. ही बंदी उठताच महाराष्ट्र प्रांतिक, आंध्र प्रांतिक, कर्नाटक प्रांतिक साऱ्या एकत्र आल्या आणि त्यांनी संस्थानी काँग्रेस स्थापन करण्याचे ठरविले. हे ठरल्यावर संस्थानी काँग्रेसचा अध्यक्ष कोणी व्हावे याचा विचार आला. सर्वांना हे माहीतच होते की आरंभापासून इथपर्यंत निजामाविरोधी लढा आणि जमीनदारविरोधी प्रखर भूमिका स्वामीच घेतात. म्हणून त्यांनाच अध्यक्ष बनवावे. प्रत्यक्षात वेळ आली तेव्हा निवडणूक झाली. स्वामी रामानंद तीर्थ यांच्याविरुद्ध बी.रामकृष्णराव यांनी निवडणूक लढविली. अर्थात निवडणुकीच्या कामाला सगळ्याच हंगामी कमिट्या होत्या. त्यामुळे तिथे मतदानाला कोण आले, कोण नाही याचा पत्ता नव्हता. निवडणुकीत बहात्तर मते स्वामींना व एकूणसत्तर मते रामकृष्णरावांना पडली. तीन मतांनी स्वामीजी संस्थानी काँग्रेसचे अध्यक्ष झाले. अध्यक्ष निवडून आल्यावर लगेच सभासद नोंदणीला सुरुवात झाली. सभासद नोंदणी झाल्यावर खालपासून वरपर्यंत संघटना बांधण्याचे काम चालले. नंतर या संघटनेचे अधिवेशन हैदराबादला घ्यावे असे ठरले. अर्थात पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक. ती मे महिन्यात झाली. तेच दोघे प्रतिस्पर्धी उमेदवार. या निवडणुकीत स्वामींना एक हजार चारशे त्रेचाळीस मते मिळाली व रामकृष्णरावांना फक्त दोनशे एकूणपन्नास मते मिळाली. केवढा प्रचंड फरक या प्रत्यक्ष निवडणुकीत ! हंगामी समित्या आणि संघटना यांत केवढा फरक ! पण काँग्रेसमध्येच हा एक गट होता की ज्याचे मत जमीनदाऱ्या जाऊ नयेत, सावकारविरोधी कायदे येऊ नयेत, निजामाचे राज्य बुडू नये. फक्त धोरण उदार झाले म्हणजे पुरे, हिंदूंनाही वाव मिळाला म्हणजे पुरे; असे होते. त्याने स्वतःची माणसे हंगामी समित्यांत भरविली होती. काशिनाथराव वैद्य, बी.रामकृष्णराव, जनार्दनराव देसाई, लक्ष्मीनारायण गजरेवाला, लक्ष्मणराव गानू, माडपाटी, हणमंतराव ताताचार ही सगळी या गटातली मंडळी. या मंडळींमुळेच मूळ आंध्रप्रदेशात म्हणजे तेलंगणात काँग्रेसची संघटना नेहमी दुबळीच असे. ग्रामीण भागात बळकट होते कम्युनिस्ट. काँग्रेस ही पुढे बलवान झाली तरी तिचे स्वरूप त्या बाजूला मध्यमवर्गीय सुशिक्षित तरुणाची आणि वरिष्ठ वर्णीयांची संघटना असेच होते. इकडे काँग्रेस ग्रामीण भागात पसरण्याची धडपड मोठ्या प्रमाणात करीत होती. तेव्हा महाराष्ट्रात

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२०८