पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/165

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कवी आहोत. ही नेहरूंची प्रतिमा पूर्ण नाही. नेहरू हे अतिशय धूर्त असे मुत्सद्दी आणि अतिशय दूरचा विचार करून आधीच नेमकें पाऊले टाकणारे गृहस्थ होते. निजामाचा पराभव झालेला आहे तो नेहरूंच्या मुत्सद्देगिरीमुळे झालेला आहे आणि तो भारताच्या अधिक समर्थ असणाऱ्या सेनेने केलेला आहे. या दोहोंतूनही आपणाला शेवटी एकाच कारणाकडे यावयाचे असेल तर निजाम मुत्सद्देगिरीत अथवा दूरदृष्टीत कुठे तरी कमी पडला असे मानण्याऐवजी भारतीय सेना अधिक प्रबळ होती याच कारणाकडे येणे भाग आहे.

 निजामाविषयीच्या भ्रामक कल्पना बदलून घेतल्याशिवाय आंदोलनाचे स्वरूपच आपल्या लक्षात येणार नाही. त्यासाठी शेवटच्या निजामाकडे येण्याअगोदर आपण थोडक्यात हैदराबादचा इतिहास पाहू *हैदराबाद संस्थान चिनकिलीझखान-मीरकमरुद्दीन-असफजहा-अव्वल या माणसाने स्थापन केलेले आहे. कमरुहीन हे त्याचे मूळ नाव. हा कमरुद्दीन औरंगजेबाच्या फौजेमध्ये अगदी लहानपणीच गेला. लौकरच तो स्वतःच्या पराक्रमाने प्रसिद्धीस आला. औरंगजेबाने त्याला चिनकुलीझखान अशी पदवी दिली. या पदवीचा अर्थ छोटा तलवारबहाद्दर. हा चिनकुलीझखान वयाच्या एकविसाव्या वर्षीच औरंगजेबाच्या मोठ्या सरदारांत गणला जाऊ लागला. म्हणून त्याला मीर म्हणू लागले व त्याचे नाव चिनकिलीझखान मीर कमरुद्दीन झाले. औरंगजेब दक्षिणेला आल्यावर जेव्हा विजापूरची आदिलशाही संपली तेव्हा तिची सर्व व्यवस्था लावण्याचे काम कमरुद्दीनकडे आले. म्हणून त्याला 'निजाम' म्हणजे व्यवस्थापक म्हणून लागले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर यांची प्रतिष्ठा मोगलांच्या दरबारात वाढली व काही काळपर्यंत हा संपूर्ण मोगल साम्राज्याचा पंतप्रधान झाला. या पंतप्रधानाला आसफदौला ही पदवी असे. याने पंतप्रधानपद सोडले. पण आसफदौला ही पदवी न सोडता त्याच्या खालची आसफजहा ही पदवी निर्माण करून स्वतःला घेतली व तो दक्षिणेचा सुभेदार म्हणून आला. नबाब मीर, उस्मानअली खान, मीरबहाद्दर, असफजहासाब, आसफदौला; निजाम या सगळ्या शब्दांचा उगम मीर कमरुद्दीनच्या पदव्यांमध्ये आहे. हा जो मूळचा मीर कमरुद्दीन तो मोठा चाणाक्ष माणूस. भारताच्या


  • हा भाग या पुस्तकात पुनरुक्ती झालेला आहे. पण कुरुंदकरांच्या मूळ लेखनाला धक्का लावायचा नाही हे धोरण आम्ही स्वीकारले असल्यामुळे या ठिकाणची व अन्यत्रची पुनरुक्ती वाचकांनी त्या संदर्भात समजून घ्यावी व आम्हाला क्षमा करावी. - संपादक
    हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१६७