पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/132

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भारतापेक्षा निराळे असे जगाशी राजकीय संबंध असणार नाहीत. पण हैदराबाद सर्व ज़गाशी व्यापारी संबंध ठेवू शकेल. हे जगातील इतर राष्ट्रांशी असणारे हैदराबादचे व्यापारी संबंध भारताच्या हितसंबंधांना बाधक असणार नाहीत. मात्र या व्यापारी संबंधावर भारत सरकारचे नियंत्रणही असणार नाही. आपल्या अंतर्गत कारभारात हैदराबादला पूर्ण स्वायत्तता राहील. एक नवीन राज्यघटना अस्तित्वात आणली जाईल. त्यानुसार विधानसभेत साठ टक्के हिंदू, चाळीस टक्के मुसलमान सभासद असतील. दर हा वर्षाला यात बदल करून क्रमाक्रमाने लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व येथवर हैदराबाद जाईल. हा प्रवास करण्याचा वेग हैदराबादची असेंब्ली ठरवील. लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व या टप्प्यापर्यंत हैदराबादचे राजकारण जाईपावेतो भारतीय संविधान हैदराबादेत लागू होणार नाही, (म्हणजे दीर्घकाळ उर्दू, तिचे वर्चस्व, नोकऱ्यांत मुसलमानांचे वर्चस्व आणि सर्व जहागिरदाऱ्या चालू राहतील) अशी थोडक्यात नबाबसाहेबांची योजना होती आणि ही कायमची योजना होती. ही योजना जरी निजामाने मान्य केली असती तर अलियावर जंगांच्या कृपेने एक कोटी हिंदूंचे कायमचे नुकसान झाले असते. नाइलाज म्हणून नेहरू, पटेलांनी वैतागून हेही कबूल केले. आमचे त्राते शेवटी निजाम व कासीम रझवीच ठरले, याची नोंद कुठेतरी होणे आवश्यक आहे.

 पोलिस अॅक्शन होण्यास इतका उशीर का लागला? सप्टेंबर १९४८ म्हणजे जवळ जवळ स्वातंत्र्योत्तर तेरा महिने हैदराबादच्या जनतेला वनवास सहन का करावा लागला? या प्रश्नांची काही प्रमुख उत्तरें या ठिकाणी नोंदविली पाहिजेत. त्यावेळचे हैदराबादच्या कृतिसमितीचे अध्यक्ष श्री. दिगंबररावजी बिंदू यांना लढा सुरू करण्यापूर्वी सरदार पटेलांनी स्पष्टच सांगितले होते की, वर्षभर तरी हा प्रश्न आम्ही स्वातंत्र्यानंतर सोडवू शकणार नाही. त्यानंतर फारसा वेळ लागणार नाही. हा प्रश्न आम्ही शक्यतो त्वरेने सोडवू. हे बोलणे बहुधा जूनच्या पहिल्या आठवड्यातील आहे. (१९४७). या जून महिन्यात स्टेट काँग्रेसचे अधिवेशन झाले. या अधिवेशनात लंढ्याच्या ठरावावर बोलताना आमचे नेते स्वामी रामानंद तीर्थ म्हणाले, हा लढा एखाद्या टर्मपुरता चालेल असे विद्यार्थ्यांनी समजू नये. तो किमान वर्षभर चालेल हे तुम्हाला माहीत असावे. ज्यांची लढा देण्याइतकी शक्ती नाही त्यांनी कृपया या लढ्यात उतरू नये. याही ठिकाणी पुन्हा एक वर्षाचा उल्लेख येतो. १९६५-६६ नंतर मी स्वामीजींना विचारले, तुमच्या त्या व्याख्यानात एक वर्षाचा उल्लेख काय म्हणून होता? स्वामीजींनी उत्तर दिले नाही,

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१३३