Jump to content

पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३८ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम


आता एका दिवसाचाहि अवधि राहिला नाही. युरोपचा नाश उद्या होणार नाही इतकीहि खातरजमा कोणी देणार नाही. तृष्णेच्या मागे लागून तिच्या तृप्तीसाठी सा-या जगाचा कोनाकोपरा पाश्चात्यांनी धुंडाळून पाहिला. या तृष्णेच्या शांतीसाठी शोध करण्यांत जगांतील एकहि स्थळ त्यांनी शिल्लक उरूं दिले नाही. पण शांतीचा मागमूससुद्धा त्यांना कोठे लागला नाही. इंद्रियजन्य सुखाचे पेले कांठोकाठ भरून त्यांचे आकंठ पान त्यांनी केले, पण पोटांतील आगीचा उपशम त्यामुळे झाला नाहीं; तृप्तीची ढेकर त्यामुळे अद्यापि आली नाही. याकरिता पाश्चात्यांत तुमच्या धर्मज्ञानाचा प्रसार करण्याची ही अ त्युत्कृष्ट संधि तुमच्या घरी चालून आली आहे. म्हणून हिंदवासीय तरु णंनो, तुम्हांपुढे आज कोणते कार्य आहे हे डोळे उघडून पहा. जगज्जेते म्हणून अखंड कीर्ति संपादन करण्याचा योग सुदैवाने तुम्हांस आज प्राप्त झाला आहे. आता हे कार्य साधा अथवा त्यांत प्राण तरी द्या. तुम्हांला कांहीं जागृति आतां खरोखरच आली असेल आणि आपल्या राष्ट्रीय जीव नांत थोडा तरी नवा जोम भरावा अशी थोडी तरी इच्छा तुमच्या चित्तांत उत्पन्न झाली असेल तर हिंदु तत्त्वज्ञानाचा झेंडा साऱ्या जगभर नाचविल्या वाचून राहूं नका.
 आपल्या धर्मज्ञानाचे साम्राज्य सा-या जगावर गाजवावयाचे असें मी म्हटले, पण याचा भलताच अर्थ कोणी समजू नये. ज्या विलक्षण भोळसर समजुतींना कित्येक शतकेंपर्यंत आपण उराशी बाळगले आहे त्यांचा अंत र्भाव तत्त्वज्ञानांत होत नाही हे लक्ष्यात ठेवले पाहिजे. असल्या खुळ्या क ल्पनांचा प्रसार जगभर करावयाचा हे आपले कार्य नसून, जगाला नव्या जीवनाची प्राप्ति होईल, असें तत्त्वज्ञान त्याला आपणांस द्यावयाचे आहे. आपल्या भोळ्या कल्पनांचा प्रसार बाह्यदेशी होऊ द्यावयाचा नाहीं; इतकेंच नव्हे, तर त्यांचा उच्छेद आपल्या देशांतूनहि करणे आपणांस अवश्य आहे. त्यांना आतां कायमची मूठमाती मिळाली पाहिजे. त्यांच्या अस्तित्वामुळेच हिंदुकुलाला अवनति प्राप्त झाली, आणि आता यापुढे ती जगली तर तुमचा मेंदूहि ती सडवून टाकतील. ज्या मेंदूला उच्च आणि उदार विचार निर्माण करण्याचे सामर्थ्य नाही, ज्यांतून अस्सल कल्पनाशक्ति नष्ट झाली आहे, ज्याला कसलाहि जोम उरलेला नाही आणि धर्म म्हणून क्षुद्र भोळसट कल्प-