Jump to content

पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४
संतति-नियमन

अल्पप्रसवितेचा उपदेश करणाऱ्या मालथसने हा ब्रह्मचर्याचाच मार्ग लोकांस दाखविला, आमच्या प्राचीन ग्रंथांच्या वचनांतून अल्पप्रस- वितेचें साधन शोधून काढावयाचे म्हटल्यासही हाच मार्ग सूचित केलेला दिसतो, आणि आज विसाव्या शतकांतही महात्मा गांधींच्या सारखे पुढारी संततिनियमनाविषयीं जेव्हां जेव्हां लोकमत जागृत करतात तेव्हां तेव्हां हा अल्पसंभोगाचा किंवा एक प्रकारच्या ब्रह्मचर्याचाच मार्ग उत्तम होय असें लोकांना सांगतात.
 संततिनियमनासाठीं ब्रह्मचर्याचा मार्ग जी मंडळी सुचवितात त्यांचें म्हणणें असें, कीं या मार्गाचें लोकांनीं अवलंबन केल्यास संततीचें नियमन तर होईलच, पण शिवाय समाजाचे इतरही अनेक प्रकारें हित होईल. ब्रह्मचर्याच्या सुपरिणामाविषयीं कोणीच शंका घेण्याचे घाडस करणार नाहीं. ब्रह्मचर्यामुळे बुद्धि, तेज व ओज हीं वाढून आयुष्याची देखील वाढ होते असें जें आपल्या शास्त्रकारांनी सांगि- तलें आहे तें सर्वस्वी खरें आहे. त्याचप्रमाणें ब्रह्मचर्यव्रताचें महत्त्व ज्या मानाने एखाद्या समाजाच्या मनावर पटलें असेल व त्याचें परि- पालन त्या समाजांतील व्यक्ति ज्या मानानें करीत असतील त्या मानानें तो समाज पराक्रमी होईल, याविषयीही कोणी सूज्ञ मनुष्य साशंक असेल असे वाटत नाहीं. संभोगाचा अतिरेक करणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या पोटीं कुसंतति निर्माण होते, त्यांचें आरोग्य बिघडतें, त्यांच्यांत शारीरिक किंवा बौद्धिक श्रम करण्याची ताकद उरत नाहीं, आणि शेवटीं त्यांची दशा करुणास्पद होऊन आंतून पोखरलेली इमारत जशी अकस्मात् जमिनीवर कोसळावी त्याप्रमाणे त्यांचे देह मृत्यूला बळी पडतात, असा अनुभव आपल्याला अनेक वेळां येतो. वीर्य हें सर्व प्रकारच्या सामर्थ्याचें व तेजाचें आदिस्थान होय. तें हवें तसें उधळून टाकणाऱ्या व्यक्तीचा सर्वनाश झाल्यावांचून राहणार नाहीं. यासाठीं वीर्याचें जतन करणें हेंच स्त्री-पुरुषांस कल्याणप्रद होय; आणि