पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काव्यात वंचितांच्या वेदना जशा आहेत, तशीच पुरोगामी वृत्तीपण. मराठी साहित्याच्या इतिहासात वंचितांच्या व्यथा, वेदनांबद्दल भरपूर लिहिलं गेलं तरी साहित्याच्या इतिहास व समीक्षेत म्हणावी तशी दखल घेतली न गेल्याने 'वंचित साहित्य : उद्गम आणि विकास' हा लेख यात आवर्जून समाविष्ट केला आहे. तो वाचल्यास त्यामागील भूमिका स्पष्ट होईल.
 विचाराच्या अंगांनी राजस्थानी साहित्य, सार्वजनिक ग्रंथालये व गांधी विचार विषयक लेखांचे महत्त्व आहे. विचाराशिवाय साहित्याची कल्पनाच करता येणार नाही. साहित्य रंजक हवे तसं प्रबोधकही! आधुनिक काळ हा बहुभाषी समाजाचा आहे. जागतिकीकरणाने माणसाचं बहुभाषी होणं अनिवार्य केलं आहे. भारतापुरतं बोलायचं झालं तर केवळ आपणास मराठी भाषा व साहित्य माहीत असणं पुरेसं नाही. भारतातील विविध भाषांतील साहित्याची जाण असल्याशिवाय आपण भारतीय होणार नाही. अन्यथा आपली ओळख एक महाराष्ट्रीय इतकीच राहील. 'लोकल' तसंच 'ग्लोबल' होणं ही काळाची गरज आहे. राजस्थानचे स्वातंत्र्योत्तर हिंदी साहित्य लेखातून भारत परिचयाचा छोटा प्रयत्न केला गेला आहे. 'सार्वजनिक ग्रंथालये' मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. शतकोत्तर हिरक महोत्सवी, अमृत महोत्सवी, रौप्य महोत्सवी ग्रंथालये महाराष्ट्रात आहेत. त्यातून या संस्थेचं महत्त्व काळानेच अधोरेखित केलं आहे. पोथ्यांनी सुरू झालेलं ग्रंथालयं आता आभासी (व्हर्म्युअल) जगाचा वेध घेत लेखन, वाचनाचा ‘ई' अवतार धारण करीत आहेत. 'ऑनलाईन रिडिंग' आता सर्रास होतं आहे. पाहणं, ऐकणंही वाचनाचाच एक प्रकार होण्याच्या आजच्या माहिती व संपर्क युगात ग्रंथालयाचा होणारा कायापालट आपण समजून घेतला पाहिजे.
 या पुस्तकातला लेख ‘सामाजिक धर्मबुद्धी व गांधी विचार' न वाचता हे पुस्तक तुम्हास मिटता येणार नाही. महात्मा गांधी हे केवळ भारताचेच नव्हे, तर जगाचे मार्गदर्शक, तत्त्वज्ञ, कार्यकर्ते होत. जीवनात संस्कृती आणि विकृती यांचा संघर्ष सुरूच असतो. त्यातून वाट काढत माणसाची जी मूल्याधिष्ठित प्रकृती, वृत्ती, कृती निश्चित होते ती सामाजिक धर्मबुद्धीमुळेच. धर्म हा व्यक्तिगत श्रद्धा व आचरणाचा विषय होय. त्याचं सामाजिक वा सार्वजनिक प्रदर्शन, आचरण करणे म्हणजे सहअस्तित्व करणाच्या अन्य धर्मियांच्या भावनांना एक प्रकारचं आव्हान असतं. म्हणून त्यापलीकडे जाऊन सर्वांना भेदरहित वृत्तीनं, समतेचा व्यवहार सामाजिक