पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : २१५

ते चार अक्षरे पाठ करतात, परंतु त्यांस ज्ञानी आणि विचारी कोण म्हणेल ? ते भारवाहक असे आहेत. मग त्यांची वर्तणूक तरी चांगली कोठून असणार ! अलीकडे पुण्यात एक दशग्रंथी विद्वान ब्राह्मण सदरी लिहिले प्रकारचा होता; त्यांस मॅजिस्ट्रेटाकडून चोरीबद्दल एक वर्षाची शिक्षा झाली. याजवरून या सर्व गोष्टी मनात आल्या, त्या कळविल्या आहेत.
 मला वाटते की, बहुत वैदिक व शास्त्री हे वाकड्या समजुतीचे लोक आहेत. व हिंदुस्थानचे विद्येचा स्वभाव असा दिसतो की, त्यातील विद्वान् बहुधा मोठा मूर्ख आणि भलतेच समजुतीचा असतो. मनुष्याहून पृथक् बुद्धी त्यास येती, अडाणी मते वगैरे त्यांस फार भासतात, यांचे काय कारण असेल ते असो. त्याचा पुढे विचार करू.
 इंग्रज लोकांनी जगातील बहुत गोष्टींचा शोध केला आहे व त्याचे खालोखाल मुसलमान लोक आहेत; कारण फारशी भागवत, भारत व वैदिक ग्रंथ अकबर बादशाह वगैरे यांचे हुकुमावरून ब्राह्मण धर्म प्रसिद्ध होण्याकरिता लिहिले आहे, तेव्हा इंग्रजांचे खाली शोधक व उद्योगी हे लोक दिसतात. ब्राह्मण लोक व मराठे लोक यांनी शंभर दीडशे वर्षे राज्य केले, परंतु असे काही केले नाही व त्या काळी इंग्रज व मुसलमान हे लोक हिंदुस्थानात होते. परंतु त्याजविषयी कोणी शोध किंवा पुस्तक केले नाही. यावरून हिंदू लोक निद्रिस्थ आहेत, असे दिसते. यांचे शहाणपण, अक्कल, विद्या व कला बाहेर गेली व बाहेरची आणावयास यांस संकट पडले, हा केवढा चमत्कार !
 पेशवाईत ब्राह्मण लोकांनी फक्त जेवणाचे पदार्थ नवे काय काय होतील व रेशमी व भरगच्ची पोशाख अंगावर कुत्री भोकावयाजोगे काय काय तयार होतील, याचा विचार करण्यात मात्र वेळ घालविला. काही विद्येपासून हित, मनाची सुधारणा व राज्याचा बंदोबस्त केला नाही, हे उघड आहे. जे हिंदुस्थानात पहिले प्रतीचे ब्राह्मण त्यांजवाचून दुसरे कोणी वाचू नये, असे नेम आहेत. त्या ब्राह्मणांचा मूर्खपणा आहे. तेव्हा इतर जातींची व्यवस्था सहजच समजेल तस्मात् हे लोक मूर्खपणात आहेत, हाच निश्चय खरा व त्यांस जागृत करण्याकरिता इंग्रजांस पाठविण्याची योजना ईश्वराने केली आहे, हाही निश्चय खरा आणि त्याप्रमाणे हा बेत सिद्धीस जाऊन हे लोक ज्ञानी व सावध होऊन सुखी व्हावे, हीच आता आशा आहे.

♦ ♦