पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : २१३

तरी का आचरण करीत नाहीत ? त्यांचे चित्त सर्व काळ लोकांस लुटण्याकडे असते. त्यांस आणखी उद्योग काही नाहीत. गंध म्होरकीदार, मुद्रा चक्रीदार व शेंड्या घेरेदार राखाव्या व ढोंग माजवावे; यांत फळ काय होणार ? असे खोटे साधू इतर ढोंगी लोकांपेक्षा शासनास अधिक पात्र आहेत असे मला वाटते.

♦ ♦


ब्राह्मणां अज्ञानचे

पत्र नंबर १७ : ११ जून १८४८

 या देशचे लोकांचे असे मत आहे की, ईश्वराचे सृष्टीत स्त्रिया थोड्या आणि पुरुष फार निर्माण केले आहेत व याचे उदाहरण ते असे दाखवितात की, किती एक पुरुष लग्न झाल्याखेरीज असतात आणि स्त्रिया लग्न झाल्याखेरीज असत नाहीत.
 याजवरून बहुत पुरुषांस स्त्रिया मिळत नाहीत; असे अनुमान ते करतात; परंतु मला वाटते की, हा मूर्खपणा आहे; कारण स्त्रियांस एकदा विवाह करण्याचा व पुरुषांस दोन तीन वेळ विवाह करण्याचा अधिकार आहे. यास्तव स्त्रिया तिकडे जास्त जातात आणि इकडे कमती येतात, तर करिता स्त्रियांस पुनरपि लग्न करण्याचा अधिकार मिळेल, तर पुरुषांस कधी कमती येणार नाही. व स्त्री-पुरुष सृष्टीत समसमान आहेत, तेव्हा पुरुष लग्नाशिवाय रहावे व स्त्रिया न रहाव्या, याचे काही कारण दिसत नाही; परंतु मनुष्याच्या रीतीत व नियमात व वर्तणुकीत याचे कारण आहे. म्हणजे ब्राह्मण लोकांनी हा मोठा अनर्थ मांडला आहे की, स्त्रियांस पुनः लग्न का करू देत नाहीत ! ही गोष्ट त्यांस इतकी बरी वाटते की, त्याविषयी जर कोणी भाषण केले, तर त्यांस मनापासून वाईट वाटते व अतिशय दुःख होते ते म्हणत की येणेकरून आमचा पूर्वापार धर्म वसिष्ठापासून चालत आलता त्यांस अपाय होईल व सर्व लौकिक बुडेल आणि आपण सारे या पापामुळे नरकात जाऊ, असे मोठमोठे विद्वान आहेत, त्यांचे देखील मनात येते. व जे गृहस्थ भट वगैरे अडाणी लोक आहेत ते तर लौकिकावाचून दुसरी गोष्ट जाणतच नाहीत.