पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : २११

आहे की, तिकडे देवळात कसबिणीस येऊ देत नाही; व जेथे गरती स्त्रिया बसतात, तेथे रांडांस बसू देत नाहीत; परंतु पुण्यात हा बंद काहीच नाही. कुळीण स्त्रिया आणि कसबिणी एके जागी मिळतात. आणि देऊळ म्हणजे भजन, पूजन, चिंतन यांची जागा; तेथे पवित्र अंतःकरणाने देवाचे सान्निध्य व्हावे, असा पश्चात्ताप व्हावा व पापबुद्धी जावी, म्हणून देऊळ बांधतात आणि यास्तव सहस्र घरे बांधली आणि एक देऊळ बांधले. याचे पुण्य सारखे, असे शास्त्र म्हणते. त्याचे कारण हेच की, भगवंताचे सेवेकरिता ते स्थान. तेथे लोकांनी जाऊन परलोकसाधनाचा विचार करावा; म्हणून त्यांचे माहात्म्य अधिक. जर तेथे तमाशे, नाच, लावण्या म्हणावयाच्या असल्या, तर देऊळ बांधले आणि गावची चावडी बांधली सारखेच आहे.
 परंतु एका चांगल्या उद्देशाने देऊळ बांधतात, आणि त्याचा उपयोग असा भलता होतो, हे केवढे लोकांचे निर्लज्जपण आणि अज्ञान आहे ! ब्राह्मण जे आपले वर्तणुकीने लोकांस नीती लावणारे, ते प्रमुखत्वें करून अशा कर्मांत पडतात. पुण्यात किती एक ठिकाणी आणखी असे पाहिले आहे की, कसबिणीच्या घरांत देवळे स्थापिली आहेत. आणि तेथे ब्राह्मण जाऊन अभिषेक, पूजा वगैरे करतात. ज्या घरात पाऊल ठेवले, तर ब्राह्मण पतित व्हावयाचे, त्या ठिकाणी धर्माची शोभा आणि त्यांस उत्तेजन आणणारी देवालये ती बांधली जातात, आणि तेथे ब्राह्मण जपानुष्ठाने करतात; तेव्हा हे कर्म कसे ? अद्यापि पुण्यात किती एक धर्मनिष्ठ ब्राह्मण आहेत. ते अशा देवळास देऊळ असे मानीत नाहीत आणि तेथे जातही नाहीत.
 एका गृहस्थाने एका कसबिणीचा पैका वहिवाटीस घेऊन ती मेल्यावर देऊळ बांधले व त्या ठिकाणी एक पुराणिक मोठा वक्ता आहे, त्यांस आणावयाकरिता तो गृहस्थ प्रयत्न करीत होता; परंतु त्याने कबूल केले नाही. मागे श्रीशंकराचार्यस्वामी येथे आले होते, तेव्हा एक गृहस्थ बहिष्कृत आहे, त्याने अशी मसलत केली, स्वामीचे चरण आपले घरास लागून अन्न, जलप्राशन झाले म्हणजे, ते ब्राह्मणांचे गुरू, तेणेकरून आपण सहज ब्राह्मणांत आल्याप्रमाणे होईल, असे मनात आणून त्याने स्वामीस काही पैका देण्याचे कबूल करून आपले घरी आणले, परंतु तीच मेजवानी त्यांची शेवटची झाली. म्हणजे कोणी एक मनुष्याने ज्या जेवणास जाण्याचे निंद्यकर्म स्वामींनी केले, असे तपशीलवार लिहून, त्याचे दरवाजास एक जाहीरनामा लाविला. असा सर्व लोकांचा आवेश जाणून स्वामींनी त्याच दिवशी कूच केला. जर काही दिवस अधिक राहिले असते, तर स्वामींनी लोकांची धर्म विचक्षणा करण्याचे एकीकडे राहून त्याचेच