पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १९९

पाप नाही. किती एक लोक गळ्यात शालीग्राम बांधतात व खांद्यावर तुळशीची झाडे घेतात, आणि पंढरपूरची यात्रा करतात, परंतु हे लोक अशा कर्माने तरतील काय ? जो मनुष्य जन्मात लोकांचे कल्याणाची गोष्ट मनात आणीत नाही, दया करीत नाही व ईश्वराचे भजनपूजन ज्ञानाने करीत नाही, तो शालीग्राम दगड गळ्यात बांधून ईश्वरापाशी कसा जाईल ? तसेच ज्या स्त्रीने व्यभिचारकर्म केले, तिने तांदूळ निवडून लाखोल्या वाहिल्या व पुष्कळ वायने दिली, तर ईश्वरास ती प्रिय होईल काय ? परंतु ब्राह्मण आळशी यांस पैसा मिळाला पाहिजे, म्हणून ते नानाप्रकारची वेडे लोकांस लावून पैसा काढितात.
 तसेच शास्त्री, पुराणिक हे लोकांस अनर्थ सांगून भ्रष्ट करतात. हे सर्व पोटाकरितां आहे व हे माझेच मत आहे असे नाही. पूर्वी तुकाराम इत्यादी साधू होते. त्यांनीही ब्राह्मणांची लबाडी जाणून अभंग केले आहेत की,

पोटासाठीं केलें ढोंग, तेथें कैचा पांडुरंग ? ।
द्रव्यलोभाचें कीर्तन, तेथें कैचा नारायण ? ॥

इत्यादीक. बहुत साधूंनी ब्राह्मणांच्या लबाडीविषयी वर्णन केले. ज्ञानेश्वर म्हणतात की,

जपतपक्रियाधर्म, वाउगाची व्यर्थ नेम |

तसेच रामदास म्हणतात की,

नको कंठ शोषू बहू वेदपाठीं,
नको तूं पडूं साधनांचे कपाटीं ।

 तेव्हा याजवरून असे सिद्ध होते की, हे किरकोळ नेमधर्म जे आहेत, त्यात काही नाही; हे सर्व व्यर्थ आहेत. ईश्वराचे मनाने भजन, पूजन करावे व मन शुद्ध ठेवावे हाच धर्म. स्नान केले नाही, तर दुःख वाटू नये आणि लबाड बोलले तर दुःख वाटावे. परंतु ही भावना आमचे लोकांची नाही, हे लोक आचाराकरिता प्राण देतात आणि विचार मुळीच करीत नाहीत. भस्म लावले म्हणजे शुद्धी होते, असे समजतात. परंतु पन्नास वेळ भस्म लावले व दोनशे वेळ अंग धुतले तर मनाचे मळ जातील काय ?
 ईश्वर शरीरास पहात नाही; मनास पाहतो. मुख्य मन शुद्ध पाहिजे; परंतु हल्लीचे ब्राह्मण पैसा काढण्याकरिता हे सांगत नाहीत. फक्त आचार, जेणेकरून पैसा मिळावयाचा, तेच सांगतात, सर्व धर्म आता लोकांच्या पैशावर आला आहे, पैसा दिला म्हणजे पाप जाते, प्रायश्चित्त होते, ईश्वर प्रसन्न होतो, असे ब्राह्मण सांगतात; याचकरिता हे असे सांगणारे सर्व मूर्ख आहेत. याजवर भरवसा