Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १९३

पुरुष न्यायी आणि दयाळू म्हणावा किंवा नाही ? त्याने चोरास सुटण्याकरिता एक मध्ये संधी ठेवली म्हणून त्याचे न्यायास विरुद्धता येत नाही. ईश्वर तर दयाळू आहे. त्याणे प्रत्येक जन्मात वारंवार संधी ठेवली आहे. जो जो मनुष्य जन्मास येईल त्यांस संधी आहेच. तरणोपायास मनुष्यजन्म आहे. या जन्मी न केला तर पुन्हा ईश्वर जन्मास घालील तेव्हा तरी करावा. अशा त्याने दयाळूपणाने वाटा ठेविल्या आहेत. म्हणून त्याचे न्यायास विरुद्धता येत नाही. इंग्रजांचे मताप्रमाणे एकच संधी आहे. पण हे बरोबर नाही.
 अशक्त जीवावर दया करणे हा मुख्य ईश्वरभजनाचा मार्ग आहे. दयेविना धर्माचे व कर्माचे सार्थक नाही. परंतु किती एक लोकांस आम्ही या जगात मरणार याचे विस्मरण होते व मग ते आपणांस आणि दुसऱ्यास एक नजरेने पहात नाहीत. जो घोड्यावरून जातो, त्यांस पायांनी कोण चालतो हे दिसत नाही आणि आमचे लोकांस दया फार कमी आहे. मूर्खपणास दया समजतात, म्हणजे अपराध्यास सोडणे हे दया नाही. न्यायास विरुद्ध न येता सोडणे ही मात्र दया. असेच दया म्हणजे अज्ञानास ज्ञान द्यावे; गरिबास द्रव्य, रोग्यास औषध, निराधारास व भुकेल्यास अन्न इत्यादी स्वभावाने द्यावे व त्यात संतोष मानावा. गरिबास पहाताच कळवळा यावा, असे सत्पुरुष थोडे आहेत परंतु जन्माचा हाच उपयोग आहे.

♦ ♦


भक्ती, कर्म आणि ज्ञान

पत्र नंबर ८३ : २५ नोवेंबर १८४९

 हिंदू लोकांचा धर्म वास्तविक विचाराने पाहिला तर फक्त इतकाच आहे की, परमेश्वर जो एक, त्याचे भजन करावे; आणि त्यावर भाव बसण्याकरिता काही तरी मध्यस्थासारखे दगडाची मूर्ती, गुरू किंवा नदी काही तरी घेऊन त्याचे आश्रयाने भक्ती दृढ करावी. आणि भाव पक्का ठरला म्हणजे त्या मध्यस्थाचीही गरज नाही व कोणत्याही कर्माची गरज नाही. आणि वेदशास्त्र यांच्याही आज्ञा त्यांस मानावयास नकोत.
 जे पुरुष संसारात आहेत त्यांस मात्र वेदशास्त्र शासन करते; परंतु परमार्थावर