पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१७६ : शतपत्रे

 पन्नास ठिकाणी पाणी शिंपतात. दोनशे ठिकाणी हात धुतात. तीनशे ठिकाणी पाय व जागोजाग नेत्रस्पर्श आणि जागोजाग मार्जन आणि देवपूजा व सोवळे मनस्वी करतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत असे ढोंग करतात आणि कोणी जेवावयास वगैरे बोलाविले, तर मग फारच लांबलचक करीतात, म्हणजे लोकांस वाटावे की, पुण्यवान प्राणी आहे. मनाची स्थिती पाहिली, तर ज्ञानशून्य. एवढा आचार ब्राह्मणांनी खटपटीचा अंगीकारला आहे.
 परंतु हा चौघांत चालवावयाचा नव्हे. याची खात्री ज्या ठिकाणी मोठा समुदाय होतो, तेथे पहावे. चिंचवडचे ब्राह्मण भोजन, निगडीचा उत्साह, तसेच मोठमोठे ठिकाणी जेथे पुष्कळ लोक जमतात किंवा प्रवासास निघतात. तेव्हा आचार निभत नाही. कारण की, उष्ट्यावर, खरकट्यावर पाय देत चालतात. एकमेकांस विटाळ होतो. शेण लावल्याचा शास्त्रार्थ करीतात; परंतु उष्ट्या अन्नावर दुसरी पाने मांडतात आणि लोक त्यावर जेवितात व त्यांस म्हणतात हा देवाचा प्रसाद, येथे काही चिंता नाही. घरी मात्र अनाचार करू नये. याजमुळे ब्राह्मण लोक हे फार नालायक आहेत. यास गावास जाणे, लढाईस जाणे, समुद्रात प्रवास करणे इत्यादिकांचा त्रास. कारण की, त्यांस प्रथम भय, दुसरे काही नसते, पण मी जेवू कसा ? माझे सोवळेओवळे कसे चालेल ? मला भांडी कोण देईल ? माझे शिजवील कोण ? इत्यादी काळजी त्यांस पडतात. याजकरिता ब्राह्मण लोक बहुधा घरी राहणारे लोक व चोरट्यासारखे आपले घरी दडून राहणारे. त्यांस कधी फार करून बाहेर पडावयाची वेळ आली म्हणजे त्यांचा प्राणान्त होतो; परंतु अशा घातकारक चाली सोडून द्यावयास काय अवघड ?
 ब्राह्मण लोकांनी सर्व जातींस मूर्ख ठरविले आणि आपण शहाणे झाले; परंतु आपण तरी पराक्रम केला असे नाही. आपल्याभोवती रिकामे घोळ पुष्कळ उत्पन्न करून ठेवले आहेत. येणेकरून ते सर्व लोकांस घेऊन आपण बुडाले, असे झाले आहे. जर इतर लोकांस लिहिण्याची व शास्त्र वाचण्याची परवानगी असून, ते विद्वान असते, तर स्वतःच पराक्रम केला असता; कारण की इतर जातीस आचाराच्या अडचणी नाहीत; परंतु ब्राह्मणांनी सर्वांचा नाश करून आपण बुडाले. आता इतर जातीचे लोक शहाणे होऊन पराक्रम करीत तो फार दिवस पाहिजेत. नाही तर आजपर्यंत इतर जातीचे हिंदू लोकांनी विलायतेस जाऊन पृथ्वी कशी आहे, याचे ज्ञान वगैरे मिळविले असते. मग ब्राह्मण याच देशात आपले घरोघर राहते, तर त्यांची काही फिकीर नव्हती. अस्तु.
 सांप्रत ब्राह्मण लोकांनी याचा विचार करावा. आपण पराक्रमी व प्रवास करण्यात व लढाईस वगैरे योग्य होण्यास आपल्यास कोणत्या चाली सोडल्या