Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१७४ : शतपत्रे

लोकही त्यांस "त्याचे लग्न पाहिजे कशास ? त्याची प्रकृती नीट झाली आणि रोजगार-धंदा करू लागले व संसार करण्याचे ज्ञान व स्त्रीस खावयास घालावयाचे सामर्थ्य आले म्हणजे 'लग्न करा' असे म्हणत नाहीत. परंतु उलटे असे म्हणतात की, ब्राह्मणाचे लग्न होत आहे, त्यांस साहित्य केले तर पुण्य आहे; असे म्हणून पैका देतात. आणि अशा मुलग्यास मुलगी कोण देतो ? म्हणून मुलीच्या बापास लाच देऊन त्याची पोरगी याचे गळ्यात बांधतात. मग लग्न झाले की दोघांनी झोळ्या घ्याव्या आणि दारोदार भीक मागत फिरावे. आणि विद्या वगैरे सर्व बुडवून त्याने स्त्रीच्या काळजीत पडावे. अशी अवस्था होऊन तो लवकर मरतो. मग विधवा स्त्री झाली म्हणजे तिचे हाल या लोकांमध्ये कसे आहेत, हे सर्वांस माहीतच आहे.
 लोक डोळेझाक करून आपले पोरांची व पोरींची त्वरित लग्ने करतात. येणेकरून दोघांचे दुःख वाढते; व बापास लहानपणी पोरे व सुना चांगल्या दिसतात, परंतु त्यांचे पाठीमागे त्यांचे हाल कुत्रा खात नाही. याचा विचार हे लोक करीत नाहीत व लग्नाची घाई करतात. येणेकरून अल्पजीवी, अशक्त, पराक्रमहीन व मूर्ख झाले आहेत. पंधरावीस वर्षांचा मुलगा झाला नाही; तो लोक म्हणतात की, लग्न का झाले नाही ? आणि त्यांस आईबाप असले तर त्याचा प्राण जाऊ लागतो; त्या वेळेस सांगतात की, कसेही करा, पण याचे लग्न करा. या मूर्खपणास काय म्हणावे ?
 याविषयी व स्त्रियांस विद्या शिकविण्याविषयी लोकांनी जरूर विचार करावा. स्त्रिया वाईट म्हणून पुष्कळ लोक म्हणतात. कोणी म्हणतात की, "स्त्रीबुद्धिः प्रलयं गतः" परंतु यांसारखे शतमूर्ख पृथ्वीत नाहीत. जसे पुरुष तशाच बायका स्वभावाने व बुद्धीने आहेत. परंतु ईश्वराने त्या घरचे कामास योजिल्या आहेत व पुरुषास बाहेरचे कामास व रोजगारास वगैरे निर्माण केले आहे. परंतु शहाणपण सारखेच आहे. जे लोक स्त्रियांस वाईट म्हणतात, त्याणी पक्के समजावे की, ही मूर्खपणाची समजूत आहे. आणि प्रायशः असे आहे की, जी स्त्री वाईट, तिचा नवरा वाईट असतो आणि नवरा चांगला असला तर त्याची स्त्री कदापि वाईट असावयाची नाही.
 स्त्रियांस शहाण्या करणे जरूर आहे. व लग्नाकरिता जे धर्म करितात त्यांणी विचार करावा. धर्म मागणारे भटात फार थोडे योग्य व गरीब असतात. कोणी म्हणतो की, मी गणपतीच्या देवळात चातुर्मास अनुष्ठान करितो, त्याची समाप्ती करण्याकरिता मला पैका द्या तेव्हा असे लोकांस धर्म करणे हा मूर्खपणा वाढविणे आहे.

♦ ♦