पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १७१

तुला आश्चर्य का वाटले? या गोष्टी तर प्रत्येक दिवशी मनुष्यामध्ये पाहण्यात येतात. एक राजाचे क्षयरोगी पोर असते, परंतु त्याचे सर्व लोक आर्जव करीतात आणि त्यांस दौलत देतात व आपण उपाशी मरतात. बरे, त्याणें स्वतः काही काम केले आहे काय ? नाही. तत्रापि लोक आंधळ्यासारखे त्यास बलिष्ठ मानितात. आणि त्यांस किनखापाच्या, मखमलीच्या कापडावर बसवितात व त्याच्याहून हजारपट शहाणे असतात, भीक मागतात, चिंध्या देखील त्यांस मिळत नाहीत. आणि राजाचे घरी कोणी एक पैसा चोरला, तर त्यांस फाशी देतात व त्यांस सर्व वहावा म्हणतात. आणि न्याय चांगला झाला म्हणतात.
 याणें चोरी का करावी? अशी आश्चर्ये लोकांमध्ये आहेत. त्यावरून जितके श्रीमंत व जितके थोर पदवीस आलेले आहेत. त्यांस असे वाटते की, आम्ही नालायक असून हे आम्हास प्राप्त झाले आहे. याजवर आमचे हक्क. परंतु ही समजूत मूर्खपणाची आहे. आपणाहून लहान लोकांचे सुखाकडे याचा उपयोग करावा, म्हणजे याचे सार्थक जहाले. मला वाटते की, प्राचीन काळचे शास्त्रकारांनी ब्राह्मणास भिक्षा मागावयाचा धर्म लावून दिला आहे. याचे कारण हेच दिसते की भिक्षान्नासारखे दुसरे अन्न पवित्र नाही. ही गोष्ट खरी आहे, परंतु जे श्रीमंत आहेत, त्यांस क्षणभरही पश्चात्ताप होत नाही. जाणी धर्माने द्रव्य संपादन केले आहे, त्यांस हजारात एक सापडेल. बाकी तर लबाडीने द्रव्य मिळविलेले आहेत. त्यात हिंदू लोकांमध्ये तर क्वचितच धर्मवान श्रीमंत आहेत. श्रीमंतास असे वाटते की, आम्ही या मालाचे मालक आहो, आम्हास हे भिकारी त्रास का देतात ?
 परंतु वास्तविक पाहिले तर त्यांस लाज वाटावी, हेच योग्य, कारण ते जे सुख भोगितात, ते लोकांचे मूर्खपणामुळे भोगितात. तेव्हा त्या मूर्खावर काही तरी दया करणे योग्य आहे. यास्तव सर्व धर्मांत दान देणे हा मोठा धर्म सांगितला आहे. सर्व धर्म याविषयी मिळतात. मोक्षाचा मार्ग दानधर्म आहे. परंतु हिंदू लोकांस दानधर्म करण्याची सवय आहे, तो दानधर्म नव्हे. वास्तविक धर्म असा की दुसऱ्याचे जे न्यून आहे, ते परिपूर्ण करावे. आणि लोकांस ज्ञानवृद्धी करून शहाणे करावे.
 परंतु हा धर्म या लोकांस कळत नाही. हिंदू लोकांमध्ये एकमेकांचा कळकळा अगदी नाही. उलटे एकमेकांचा नाश करून त्यात थोरपणा मानणारे बहुत आहेत. जर अन्यायाने एकाचा नाश जहाला, तर इतर स्वस्थ जाग्यावर बसून त्याचे हाल पाहतील. एकावर अन्याय जाहला तर सर्वांनी त्याचा न्याय होण्याकरिता मदत करावी, हे शहाणपण त्यांस नाही. यास्तव मुसलमानांनी