पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १६९


दया

पत्र नंबर ४७ : १ फेब्रुवारी १८४९

 हिंदू लोकांची अंतःकरणे पराकाष्ठेची थंड आहेत. ही उष्ण करण्यास महान उपाय पाहिजेत. त्यात मुख्यत्वेकरून ब्राह्मण लोक फार निर्दय व शैत्यान्तःकरणी आहेत. असे की जर कोणी मरत असेल, तर किंवा दुखणेकरी असेल तर ते त्याजकडे पाहिल्याशिवाय वाटेने स्वस्थ जातील.
 या दुर्गुणाची निंदा पुराणात कोठे कोठे केली आहे. त्यावरून असे सिद्ध होते की, हा दुर्गुण प्राचीन काळापासून या लोकांत आहे. एके ठिकाणी व्यासांनी अलंकारपूर्वक असा दुर्गुण वर्णन केला आहे की, एके समयी श्रीशंकर व पार्वती हे संवादात म्हणाले की, शिवानी काशीक्षेत्र निर्माण केले त्या ठिकाणी जे लोक जातात ते सगळे मोक्षास जातील की काय ? असे पार्वतीने पुसले. तेव्हा शंकर म्हणाले की, काशीस जाण्याने सर्वांस मोक्ष होतो, असे नाही. जे सदय अंतःकरणाचे आहेत, ते जरी गेले न गेले तरी मोक्षास पात्र आहेत.
 तेव्हा याची प्रचीती दाखवावी, म्हणून उभयता कैलासाहून निघाली. एकाने व्याघ्रस्वरूप व एकीने गायत्रीस्वरूप धारण केले; आणि काशीचे वाटेवर यात्रेमध्ये चिखल होतो, त्यात गाय बुडाली आहे आणि पलीकडे कोरडी जागा आहे. तेथे व्याघ्र उभा आहे व तो गाईवर टपून बसला आहे, असे दाखविले. त्या वाटेने हजारो लोक जात होते. परंतु ते सर्व यात्रेवर नजर देऊन गाईची मोकळीक न करता पुढे गेले. एक ब्राह्मण मात्र दयावान होता त्याच्याने पुढे जाववेना, तेव्हा त्याने व्याघ्रावर शस्त्र धरून त्यांस पळवून लावले, आणि गाईस बाहेर काढले. त्यासमई शिवास पार्वतीने सांगितले की, इतक्या यात्रेमध्ये एवढा मात्र प्राणी मोक्षास पात्र आणि यास मात्र यात्रेचे फळ आहे. कारण की त्याची वासना सत्कर्मावर आहे. बाकीचे लोक सत्कर्मास न जाणून यात्रा मात्र करतात. ती निर्फळ होय.
 याजवरून तात्पर्य असे की, दया हे मोठे स्वर्गाचे द्वार आहे; परंतु सांप्रतकाळचे लोक आमचे पाहण्यात असे आले आहेत की, त्यांची अंतःकरणे पाषाणाप्रमाणे कठीण आहेत. ते आपले अंगावर दहा हजारांचे जवाहीर व शंभर रुपयांचा पोषाख वापरतील; परंतु जवळ एक भिकारी चिंध्या पांघरलेला आणि उपाशी दीनवाणीने मागावयास आला, तर त्यांस काही देणार नाहीत.