Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १६७

अर्थ पाहिला तर दुसरा काही नाही, परंतु बायकांचा वेळ जात नाही, तो सुलभपणे जावा आणि त्यांस काही उद्योग, सुख सापडावे, म्हणून या युक्ती केल्या आहेत.
 परंतु भोळसर लोक हेतू जाणत नाहीत. दुसरे असे आहे की, कार्तिक मासी लोक दीपदान करीतात व करंड्याफण्याची वायने देतात. हा धर्म अगदी उलटा आहे. कारण दोन पैशांचे टिवळे, त्यात दमडीचे तूप घालून ब्राह्मणास देतात. त्यापासून जो दान घेतो त्याला काही उपयोग नाही. आणि निरुपयोगी पदार्थ करण्यात कारीगरांचा वेळ मात्र जातो. तसेच भटाचे करंड्याफण्या करतात, त्यात काय अर्थ आहे ? ते जिन्नस् कोणाचेही उपयोगी नाहीत. व्यर्थ पैसा जातो. दान घेणारास त्याचा उपयोग नाही व लोकांसही नाही आणि देणाराचे मात्र नुकसान. तेव्हा असली मूर्खपणाची दाने हे लोक कशाकरिता करीतात ? दान करण्याचा हेतू न जाणून शास्त्रात लिहिले आहे की, दीपदान करावे, म्हणून करतात. परंतु शास्त्रकारांचा हेतू जाणून दान करीत नाहीत. मला वाटते एक समई गरिबास दिली आणि टिवळी पन्नास वर्षे दिली तरी फळ सारखेच आहे. परंतु लोक मूर्खपणाने जावयाचे गोष्टीसारखे शास्त्र चालवितात.
 एक जावई घरून निघून सासऱ्याचे घरी जाऊ लागला. तेव्हा त्याचे बापाने त्यांस सांगितले की, सासरा काही गोष्टी पुसेल तर काहींस होय म्हणावे व काहींस नाही म्हणावे. जावयाने तेवढीच गोष्ट ध्यानात ठेवली आणि हेतू सोडून व आपली बुद्धी चालविण्याची सोडून दिली. पुढे सासऱ्याची गाठ पडली तेव्हा प्रथम प्रश्न त्याने केला की, "केव्हा आताच आला ?" त्याने "होय." म्हटले. दुसरा प्रश्न "व्याह्याची प्रकृती बरी आहे ?" त्याने "नाही" म्हणून उत्तर दिले. तेव्हा सासऱ्याने पुसले "अहो; फार प्रकृती बिघडली आहे काय ?" जावयाने उत्तर दिले की, "होय." "आम्ही भेटीस गेलो तर भेट होईल की नाही ?" त्याने "नाही" म्हणून जबाब दिला. तेव्हा व्याही घाबरा झाला आणि जावयास घेऊन व्याह्याचे घरी आला, तो तो यथास्थित आहे. मग चौकशी केली तो जावयाने असे सांगण्याचे कारण समजले.
 जसा हा मूर्ख जावई सांगितल्या शब्दाप्रमाणे वागला आणि बुद्धी चालविली नाही, विचार केला नाही तसे हिंदु लोक सांगितल्या शब्दाचे आहेत. त्यांस हेतू समजणे हे ठाऊक नाही. याप्रमाणेच पाठ करणारे लोक आहेत. कोणी गीता पाठ करतो, कोणी विष्णुसहस्रनामाचा पाठ करितो, कोणी सप्तशती वाचतो, कोणी वेद पाठ करतो. परंतु त्यांचा अर्थ त्यांस समजत नाही. पाठ करणारे लोक भारवाहक व वेडे आहेत. पण लोक ते अगदी विसरले आणि पाठ