पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/23

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आणखीही काही नियमांचा ह्यांत समावेश होता. ते न पाळणाऱ्यांना संरक्षित म्हणून वागवले जाणार नाही व त्यांना ठार करण्याचा राजाला अधिकार प्राप्त होईल असे या नियमांचे सर्वसाधारण स्वरूप होते.
 धर्मांतरे सक्तीने झाली, तसेच या अपमानित अवस्थेतून मुक्त होण्यासाठीही लोक धर्म बाळगू लागले. अरबस्तानमधून ज्यू आणि ख्रिश्चन यांची हकालपट्टी झाली. परंतु एवढ्या प्रचंड साम्राज्यातील बहुसंख्येची हकालपट्टी करणे शक्य नव्हते. त्यांना मुसलमान करून घेणे हाच मार्ग उरला. सिरिया, इराक, जॉर्डन, येमेन, इत्यादी प्रदेशांत धर्मांतर थोड्या काळात पार पडले. एक तर तेथील अरब टोळ्या वंशाने मुसलमान अरबांना जवळच्या होत्या. शिवाय या प्रदेशावर रोमन आणि बायझान्टाइन या परक्या लोकांची जुलमी सत्ता होती. पश्चिम आफ्रिकेतही धर्मविस्तार झपाट्याने झाला. इराणमध्ये बहुसंख्यांक लोक मुसलमान बनावयास तीन-चारशे वर्षे लागली. पश्चिम आफ्रिकेतील बर्बर टोळ्यांनी (आताचा ट्यूनिशिया) इस्लामला कडवा प्रतिकार केला. त्यांना पुन्हापुन्हा जबरदस्तीने मुसलमान करण्यात येई आणि पुन्हापुन्हा ते आपल्या मूळच्या ख्रिश्चन किंवा ज्यू धर्माकडे वळत! अनेकदा जिझिया अतिशय निष्ठूरपणे वसूल केला जाई. आताच्या मोरोक्कोमधील एका ठिकाणी जिझिया देण्यासाठी तेथील बिगरमुसलमानांना आपली मुले विकावी लागली. मुसलमान सैन्याला प्रतिकार झाल्यास जिंकलेल्या प्रदेशातील सर्व बिगर-मुसलमानांची मालमत्ता जप्त करण्यात येई! अशा परिस्थितीत जिंकलेल्या प्रदेशातील लोक मुसलमान झाले नसते तरच आश्चर्य! एकदा जिंकलेला हा सारा प्रदेश बहुसंख्य लोक मुसलमान झाल्यामुळे कायमचाच मुसलमानी सत्तेखाली राहिला.
 परंतु इस्लामच्या या इतिहासाला एक दुसरीही बाजू आहे आणि ती पराभवाची आहे. इ.स. ७११ मध्ये तारिकने जिब्राल्टरची सामुद्रधुनी ओलांडून स्पेनमध्ये प्रवेश केला. इ.स. ७१३ मध्ये, म्हणजे केवळ दोन वर्षांच्या अवधीत, सर्व स्पेन ताब्यात आला आणि थोड्याच वर्षांच्या अवधीत आयबेरियन भूशिर अरबांच्या टाचेखाली आले. अरब सैन्य पुढेपुढे, फ्रान्सच्या रोखाने घुसू लागले. इ.स. ७२१ मध्ये फ्रान्समधील तुलो येथे अरबांचा पहिला पराभव झाला. परंतु त्यामुळे या घोडदौडीला पायबंद बसला नाही. इ.स. ७३० साली ऐव्हिग्वॉन सर झाले आणि सर्व गॉल प्रदेश ताब्यात आला. गॉलचा गव्हर्नर अब्दुल रहेमान याने विजयाची ही परंपरा पुढे चालविण्याचा निश्चय केला. त्याने बोर्दो जिंकले आणि लॉयरे व तूरच्या दिशेने फ्रान्समध्ये पुढे घुसत असताना प्रथमच इ.स. ७३२ साली चार्लस दि हॅमरने अब्दुल रेहमानचा पराभव केला. या पराभवानंतर अरबांची घोडदौड थांबली. इ.स. ७११ मध्ये तारिकने जिब्राल्टर सामुद्रधुनी ओलांडल्यानंतर इ.स. ७३२ मध्ये म्हणजे केवळ २१ वर्षांच्या अवधीत सुमारे एक हजार मैल (स्पेन ते तूर हे अंतर १००० मैल आहे.) ते पुढे घुसले होते. (तूरच्या या विजयाबद्दल युरोपात थेंक्सगिव्हिंग डे पाळला जातो.)

 तूरची ही लढाई निर्णायक ठरली आहे. इस्लामच्या स्पेनकडून होणाऱ्या विस्ताराला तेथे कायमचा पायबंद घातला गेला. इतकेच नव्हे तर त्याची लाट परतविण्याची प्रक्रिया सुरू झाली. ही परतविण्याची प्रक्रिया मात्र तेवढी नेत्रदीपक नाही. ख्रिश्चनांनी हळूहळू डोके वर काढले. इ.स९१० पर्यंत उत्तर स्पेनमधून अरबांना मागे रेटण्यात ख्रिश्चनांनी यश मिळविले.

२२/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान