पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/181

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे. त्याचा गाजावाजा करण्याचे काय कारण आहे? कालांतराने हे दोष नष्ट होतीलच!
 काळ हाच जर सर्व रोगांवर इलाज असेल तर मुस्लिम प्रश्नही काळावर सोपविलेला बरा. काळच मुसलमानांना धर्मनिरपेक्ष बनवील. ते आपोआपच परधर्मीयांशी प्रेमाने वागू लागतील. आपण आंदोलने करण्याची काय गरज आहे? इस्लाममध्येही काही चांगल्या गोष्टी आहेत, अशीही भूमिका घेता येईल. जमाते मुस्लिम हीच भूमिका घेते. अनेक सुशिक्षित मुसलमानांचे हेच म्हणणे असते. जनसंघाला अर्थात ही भूमिका अमान्य आहे. मुसलमानांना झोडपून का होईना, सुधारले पाहिजे असे त्यांच्यापैकी एक वर्ग म्हणत असतो. तर मुसलमान कधी सुधारू शकणार नाही, काळही याला सुधारू शकणार नाही असे म्हणणाराही एक वर्ग आहे. मात्र मुसलमानांना धाकात ठेवले पाहिजे हे बहुधा सर्वजण मानतात असे दिसते.
 म्हणूनच हिंदु-मुसलमान दंगा असो किंवा भारत-पाकिस्तान युद्ध असो, जनसंघाची वृत्तपत्रे, काही नेते आणि कार्यकर्ते कमालीची मुस्लिमविरोधी भूमिका घेताना दिसतात. प्रत्येक दंग्यात त्यांना मुसलमानांचा हात दिसतो. आगळीक मुसलमानांनी केलेली असते. समग्र हिंदू हे मुस्लिम हल्ल्याचे बळी असतात असे ते मानतात. मुसलमान दंग्यात आगळीक करीत नाहीत असे नाही, परंतु अनेकदा हिंदूही आगळीक करतात. जनसंघाची ही भूमिका आणि मुस्लिम जातीयवाद्यांचे 'मुस्लिम निष्पाप असतात' हे सांगणे एकाच प्रकारच्या वृत्तीचे द्योतक आहे. अनेकदा दंग्यात मुस्लिम लोकांच्या मालमत्तेचे जास्त नुकसान झाले आहे. अशा वेळी आपण सर्व भारतीयांसाठी काम करतो असे म्हणणाऱ्या जनसंघाने मुसलमानांना काही मदत पुरविल्याचे दिसत नाही. अहमदाबादेत दंगा झाल्यानंतर बडोदा येथे रस्तोरस्ती जनसंघाने 'हिंदूंनो, तुमच्या रक्षणासाठी जनसंघ' अशा अर्थाचे फलक लावले होते. भिवंडी येथे दंगा झाल्यानंतर मुंबईला झालेल्या एका मोठ्या सभेत श्री. अटलबिहारी वाजपेयी यांनी 'हिंदू आता मार खाणार नाहीत' अशी घोषणा केली. हिंदूंनी मार खावा असे सुज्ञ मनुष्य म्हणणार नाही. हिंदू मार खात असले तर त्यांच्या रक्षणासाठी धावून येण्यात गैरही काही नाही. पण इतरांनी मार खाल्ला तर चालेल असा या विधानाचा अर्थ आहे. आणि तरीही जनसंघ घटनेने धर्मनिरपेक्ष आहे.

 जवळजवळ प्रत्येक मुसलमान हा देशद्रोही असतो असे सिद्ध करणाऱ्या जनसंघाच्या राजकीय परिपक्वतेबद्दल आता शंका आल्याखेरीज राहत नाही. भारत-पाकिस्तान युद्धात हे विशेष जाणवले. भारतीय मुसलमानांच्या रूपाने पाकिस्तानी हेर कसे देशभर थैमान घालीत आहेत याच्या सुरस कथा जनसंघाच्या कार्यकर्त्यांकडून तेव्हा ऐकायला मिळत. दिल्लीला कुठल्या तरी एका तलावात मुसलमानांनी विष टाकले आहे अशी एक कथा तेव्हा प्रसृत झाली होती. डॉ. झाकिर हुसेन हे १९६५ च्या युद्धाच्या वेळी उपराष्ट्रपती होते. हवाई दलात असणाऱ्या त्यांच्या एका पुतण्याने भारताच्या वरिष्ठ सैन्याधिकाऱ्यांना सीमेवर घेऊन जाणारे विमान पाकिस्तानकडे वळविले तेव्हा एका सैन्याधिकाऱ्याने त्याला गोळी घालून ठार केले व विमान परत भारतीय हद्दीकडे वळविले अशी सोयीस्कर अफवा १९६५ च्या युद्धात पसरविण्यात आली होती. डॉ. झाकिर हुसेन यांना कलंकित करणे हा त्याच्यामागील उघडउघड हेतू

१८०/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान