पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मांडणी केलेली आहे. अशा परिस्थितीत मुस्लिम राष्ट्रे एकमेकाला धरून अमेरिकेविरुद्ध प्रयत्न करणे स्वाभाविकच आहे. वास्तविक सांस्कृतिक संघर्षाचा हा सिद्धांतच मुळी चुकीच्या पद्धतीने मांडलेला, गैरलागू सिद्धांत आहे. 'एन्ड ऑफ हिस्टरी' चा लेखक फ्रेंन्सिस फुकुयामा हा सिद्धांत अमान्य करतो. अमेरिकेतील इस्लामी अध्ययन संस्थेच्या प्रो. शिरीन हंटर यांनी 'दि फ्यूचर ऑफ इस्लाम अँन्ड दि वर्ल्ड' हे पुस्तक लिहून संस्कृती-संघर्षाचा मुद्दा खोडून काढलेला आहे. जगात मुस्लिम देशांतील राष्ट्रवाद बलवान असून ते एकमेकांविरुद्ध लढत असतात. इतकेच नव्हे, तर पैगंबर साहेबांच्या मृत्यूनंतर लगेच वारसायुद्ध व झगडे सुरू झाले होते. तेव्हा मुस्लिम जगत हे एकसंध आहे असे मानून संस्कृती-संघर्षाचा हा सिद्धांत मांडणे चुकीचे आहे असे त्यांचे मत आहे. मात्र अमेरिकेच्या या भूमिकेमुळे मुस्लिम मन काहीसे भयग्रस्त आहे हे कबूल केले पाहिजे. अशा परिस्थितीत आपली परराष्ट्रीय धोरणे अमेरिकेच्या दबावाखाली आखणे अत्यंत घातक ठरेल. विकसित देशांच्या जागतिकीकरणाच्या मोहिमेचे नेतृत्व अमेरिकेकडे असून विश्व बँक, नाणेनिधी व विश्वव्यापार संघटना यांचे लगाम अमेरिकेने आपल्या हातात ठेवले असून सर्व मागास देश बहुउद्देशीय कंपन्यांच्या उदरात ढकलण्याचे पाप अमेरिका करीत आहे. भारतातील भाजपाचे सरकार संस्कृतीसंघर्ष आणि जागतिकीकरण या दोन्ही प्रश्नांबाबत पूर्णपणे अमेरिकेच्या मांडलीक राष्ट्राप्रमाणे वागत आहे, त्याचेही दुष्परिणाम भारतीय समाजावर झाल्याशिवाय राहणार नाहीत.
 आज जगामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यांमध्ये, जागतिकीकरणामुळे मागास देशांचा होणारा विनाश आणि तेथे वाढणारा असंतोष हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याबरोबरच धार्मिक मूलतत्त्ववाद, दहशतवाद, अस्मितेचे प्रश्न, बहुसंस्कृतिवाद, बहुसंख्यांक व अल्पसंख्यांकांचे वाद आणि उत्तर-आधुनिकतावादाने पुढे मांडलेले अनेकविध प्रश्न यांचा विचार आपणांस करावा लागणार आहे. मुस्लिम समाजाला स्वरचित कोषाबाहेर येऊनच खुलेपणाने या प्रश्नांचा विचार करावा लागणार आहे. त्या दृष्टीने हमीद दलवाई यांनी मांडलेली भूमिका ही अत्यंत मोलाची व उपयुक्त आहे.

::::

 डॉ. रफिक झकेरिया यांनी नुकताच १५ मार्च २००२ रोजी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एक लेख लिहिला असून जगभराच्या मुस्लिमांपुढे ज्या गंभीर समस्या पैदा झाल्या आहेत त्यांचे विवरण केले आहे. त्यांच्या भाषेत 'लिबरल इस्लाम इज बेस्ट डिफेन्स.' इस्लामी धर्मशास्त्रात उदारपणा आणल्याशिवाय अमेरिकेने निर्माण केलेला धोका टळणार नाही, असे त्यांचे मत आहे. त्यासाठी कालविसंगत गोष्टी सोडून आधुनिकता स्वीकारावी लागेल. हमीद दलवाई यांनी इस्लामी धर्मशास्त्राच्या उदारीकरणाची मागणी केलेली नाही. कदाचित त्यांना जे काम अवघड वाटत असेल. मात्र मुस्लिम समाजात अपवाद म्हणून ते उदारमतवादी मुसलमान आहेत त्यांच्याऐवजी उदारमतवादी मुसलमानांचा, अन्य धर्मीयांत आहे असा वर्ग बनावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. यासाठी मात्र जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज आहे.

 परिस्थिती फार निराशाजनक नाही. १९८८ मध्ये आंतरराष्ट्रीय मुस्लिम स्त्री कार्यकर्ता

राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान/१५