पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/७६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तुम्ही एक घराणं - नेहरू घराणं वापरलं, त्यांनी त्याच्यापेक्षा जुनं घराणं; सत्ता मिळण्याकरिता. तेही चोर, तुम्हीही चोर."
 सत्ता - जादूई चिराग
 असं का झालं? सत्तेकरिता लोक इतके पागल का होतात? त्याचं कारण मी संघटनेच्या मेळाव्यांमध्ये अनेकदा सांगितलं आहे. शेती करा, नांगर चालवा, कष्ट करा, आयुष्याच्या शेवटापर्यंत मळकं धोतर बदलायची काही शक्यता नाही. उलट, बापानं तुमच्याकरिता जी काही जमीन ठेवलेली असेल त्यातली दोनचार एकर विकूनच तुम्ही तुमच्या पोराच्या हाती देता. शेती जमत नाही म्हणून दोन गाई ठेवल्या, चार म्हशी ठेवल्या, दूध काढलं तरी दूध विकून कुणी माडी बांधली असं उदाहरण मला अख्ख्या महाराष्ट्रात सापडलं नाही; पण दूध विकायच्या ऐवजी जर का गावच्या सोसायटीचा चेअरमन झाला तर मात्र एका वर्षामध्ये तो माडी बांधतो. यातलं रहस्य लक्षात ठेवा. तुम्ही कितीही कष्ट केले तरी तुम्हाला काही मिळायची शक्यता नाही, पण निवडणूक लढवली आणि निवडणूक जिंकलो म्हणजे मग सगळं काही भरपेट मिळतं हे दूध सोसायटीच्या बाबतीतही खरं.
 अरबी सुरस कथांमध्ये एक गोष्ट असते ती तुम्ही सर्वांनी ऐकली असेल. एखादं पोरगं उनाड असतं. त्याचे आईबाप त्याच्यावर रागावतात आणि त्याला घरातून काढून लावतात. मग ते पोरगं बाहेर पडतं. सदा सर्वकाळ उनाडक्याचं केल्यामुळे आता काय करावं ते त्याला समजत नाही. मग त्याच्या नशिबानं त्याला एक जादूची अंगठी किंवा जादूचा दिवा सापडतो. एकदा का ती अंगठी किंवा दिवा हातामध्ये आला की एक राक्षस समोर उभा राहतो. मग तो राक्षस विचारतो, "मालक, काय करू मी तुमची सेवा?" मग त्यानं नुसतं सांगायचं, "आता मला भूक लागली आहे, ताटभर जेवायला दे." पोट भरलं की पुन्हा दिवा घासायचा, की राक्षस हजर. विचारतो, "काय देऊ." मग, "मला एक मोठा महाल बांधून दे." म्हणायचं. ताटभर जेवण असो की मोठा महाल असो की सगळ्या जगातली सुंदर राजकन्या असो दिवा घासला की काय वाटेल ते मिळतं. तशी ही सत्तेची खुर्ची म्हणजे 'जादूचा दिवा' झाला आहे. कोणाही नालायक माणसाच्या हाती हा दिवा गेला अन् त्यानं दिवा घासला की त्याला सगळं काही मिळतं. कॉलेजमध्ये कॉपी करताना सापडली म्हणून नापास झालेली पोरं, नंतर शिक्षणमंत्री बनतात आणि दिल्लीलासुद्धा जाऊन आणखी काही बनतात आणि एकदा का मंत्री झाला की हा पोरगा किती उनाड होता, किती गुंड होता, टवाळ्या करत कसा फिरत होता याच्याकडे न पाहता मोठे मोठे विद्वान,

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ७६