पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२७०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चरितार्थाचीच नव्हे तर राजकीय चरितार्थाचीही थोडीफार व्यवस्था करतात. या मोहावर उत्तर म्हणजे यापुढे शेतकरी संघटना ही 'संन्याशाच्या वैभवा'वरच चालणार आहे. असा संन्यास पत्करल्यानंतर आता मला एका तऱ्हेने खूप मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटतं आहे. त्यामुळे, गेल्या वर्षभरात नेमकं काय काय घडलं ते मी सविस्तरपणे मांडू इच्छितो. कारण, गेल्या वर्षभरात इतक्या काही विपरीत गोष्टी घडल्या आहेत की ज्यांनी माझ्या विचारांचं अभ्यासपूर्वक श्रवण केलं आणि समजून उमजून पालन केलं आहे त्यांच्याही मनात गोंधळ निर्माण होऊ लागला आहे.
 ज्या शरद पवारांनी, उसाला ३०० रुपये भाव मिळाला पाहिजे असे शेतकरी संघटनेने तीस वर्षांपूर्वी म्हटले तेव्हा 'उसाला ३०० रुपयांचा भाव दिला तर सगळे साखर कारखाने मोडीत काढावे लागतील' असे जाहीर केलं होतं तेच शरद पवार आज, 'जर का शेतीमालाला रास्त भाव मिळाला तर शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज साठणारच नाही' असं शरद जोशींचंच वाक्य तीस वर्षांनंतर म्हणू लागले तर साहजिकच शेतकऱ्यांच्या मनात शंका निर्माण होते की कोण काय बोलतंय? रावणाच्या तोंडी रामाची स्तुती ऐकून मनुष्य गोंधळून जावा तशी काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा गोंधळ निर्माण करणाऱ्या, काही मुद्द्यांची सविस्तर मांडणी मी इथे करणार आहे.
 ३१ डिसेंबर २००७ रोजी सगळ्या शेतकऱ्यांना मी रामेश्वरला यायला सांगितलं आणि रामेश्वरच्या समुद्रात शेतकऱ्यांच्या कर्जासंबंधी कागदपत्रे बुडवण्याचा 'समुद्रस्तृप्यन्तु' कार्यक्रम झाला. तेथून निघताना आपण संपूर्ण हिंदुस्थानातील शेतकऱ्यांना आदेश दिला की, "तुम्ही फक्त तुमच्या जवळचे कागदपत्र समुद्रात बुडवले आहेत, पण तुमच्या गावातील सोसायट्यांमध्ये तुमच्या कर्जासंबंधीचे कागदपत्र शाबूत आहेत तोपर्यंत कर्जातून मुक्ती मिळणे शक्य नाही आणि त्या सावकाराचा तुमच्या मागचा ससेमिरा चुकत नाही. ते कर्ज जर संपवायचे असेल तर येथून घरोघर जा आणि ज्या ज्या ठिकाणी तुमचे कर्जाचे कागद आहेत तेथे धडक मारा. प्रामुख्याने ते गावातल्या सोसायटीतच असतील, काही दीर्घ मुदतीच्या भूविकासाकरिता घेतलेल्या कर्जाचे कागद एखाद्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी असतील, पण तुमच्या कर्जाच्या कागदाचं प्रमुख स्थान ही तुमच्या गावची सोसायटी आहे. त्या सोसायटीच्या रक्षणाकरिता दिवसरात्र पोलिसांचा बंदोबस्त आहे अशीही परिस्थिती नाही. गावातल्या या सोसायटीतील तुमची कागदपत्रे जाळून नष्ट करण्याचा आदेश मी तुम्हाला देतो आहे. याकरिता जी काही शिक्षा व्हायची असेल ती तुमच्याबरोबर भोगायला मी तयार आहे -

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २७०