पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२६५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

फक्त कॅनडा किंवा सैबेरियासारख्या भागातच येऊ शकेल, हिंदुस्थानामध्ये ते होणार नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसमोर उभ्या राहणाऱ्या समस्या कोणत्या? विशेष आर्थिक विभाग (SEZ) संबंधी काय धोरण असावे? जागतिक व्यापार संस्थेची बोलणी आणि वाटाघाटी फिसकटल्यानंतर यापुढे इलेक्ट्रॉनिक मार्केटिंगची व्यवस्था वापरून जागतिक बाजारपेठेत सरकारविरहित खुली व्यवस्था तयार करता येईल का?
 आवाहन
 हे सर्व प्रश्न नव्याने उभे राहत असताना ही कार्यकारिणी गेल्या २०-२५ वर्षांमध्ये शेतकरी संघटनेपासून - काही समजातून, काही गैरसमजातून - दूर झालेल्या सर्वांना आवाहन करते की आता मनामध्ये किरकोळ विवाद ठेवता सर्वांनी शेतकरी आंदोलनाच्या या मध्यप्रवाहात पुन्हा सामील व्हावे.
 शेतकऱ्यांपुढे नव्याने उभ्या राहणाऱ्या वरील प्रश्नांचा अभ्यास आणि चिंतन करून ते सोडविण्याचे मार्ग जी शेतकरी संघटना दाखवेल तिच्या मागे शेतकरी येतील; ८० सालची जुनीच भाषणे पुन्हा करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत.
 ऊस आंदोलन
 "यंदा साखरेचा साठा पुष्कळ आहे, उसाचे उत्पादन पुष्कळ आहे आणि शेतकऱ्याला गेल्या वर्षीचा झटका इतका बसला आहे की आता पुन्हा ऊस तोडू नका म्हणून सांगायला गेलो तर शेतकरी आपल्यालाच दगड मारायची शक्यता आहे." असे एक मत या बैठकीत मांडले गेले. पण दलित, आदिवासी, अल्पसंख्याक (मुसलमान) या समाजांची अशी जरब आहे की त्याच्या वाटेला कोणी जात नाही; शेतकऱ्यांबद्दलमात्र काहीही वक्तव्ये केली तरी चालतात अशी एक धारणा झाली आहे. हे चालणार नाही अशी शेतकऱ्यांची जरब बसवणे आवश्यक आहे. कदाचित, आम्ही आमच्या ताकदीने मारलेला टोला वर्मी बसणार नाही, पण यांनी टोला घालण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही असं जर झालं तर शेतकऱ्यांची शान या देशामध्ये काहीही राहणार नाही. तेव्हा 'जीव देण्यापेक्षा जीव घेण्याचा आत्मसंरक्षणात्मक प्रयत्न करणे - तो अयशस्वी का होईना - केव्हाही श्रेयस्कर.' तेव्हा उसाच्या भावाचे आंदोलन अपरिहार्य आहे. ९०० रुपयांपर्यंत भाव मिळत नसेल तर आपले आंदोलन शासनाच्या विरुद्ध आहे, ९०० च्या पुढे भाव मिळविण्याचे आंदोलन प्रत्येक कारखान्याविरुद्ध शेतकरी संघटनेने करायचे आहे. त्या त्या कारखान्यावर जे आंदोलन उभे केले जाईल त्यात महाराष्ट्रभरातून शेतकरी संघटनेचे पाईक भाग घेतील. एखादा कारखाना किमान वैधानिक किमतीइतकाही भाव उसाला देत नसेल तर ती कायदा मोडणारी कृती आहे.

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २६५