पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२४६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

Synthetic Model (विश्लेषक नमुना) पद्धतीने उसउत्पादनाचा हिशोब केला तर या काटकसरीच्या आकडेवारीत किमान २०% अधिक धरावे लागतील आणि मग सेनापतींनी काढलेल्या २१४९ रुपये उत्पादनखर्चात किमान ४० ते ५० रुपये अधिक धरावे लागतील आपण तो प्रति टनाला २२०० रुपये धरायला हरकत नाही. तेव्हा, शेतकऱ्यांना उसाला अंतिम भाव हा किमान २२०० पेक्षा जास्त असायला पाहिजे. खरे तर, आपण २२०० रुपये खर्च केल्यानंतर साधारण वर्षभराने ते भरून निघत असतात हे पाहिले तर अंतिम भाव २३०० किंवा २४०० मिळायला हवा; पण सध्या आपण २२०० वर थांबून राहू या; पण लढाई ही काही अंतिम भावावर - लबाडांघरच्या आवतनावर – होत नाही. शेवटी काय मिळणार काय भरवसा? त्यादरम्यान निवडणुका झाल्या तर सगळे संचालक मंडळच बदलून जाईल अशी अनिश्चितता. म्हणून, परंपरेने आपली लढाई झाली आहे ती कारखान्याला ऊस घातल्या घातल्या मिळणाऱ्या पहिल्या हप्त्यासाठी. माझ्यासमोर ठेवलेल्या आकडेवारीचा मी बारकाईने अभ्यास केला आहे. ८% साखर उतारा असेल तर त्या उसाला अंतिम किंमत १४५० रुपये मिळायला हवी. १०% उताऱ्याच्या उसाला ती १९५० किंवा २००० असायला हवी आणि १२% उतारा असेल तर २१७० पेक्षा कमी असता कामा नये; पण लढाईचा मुद्दा म्हणून पहिल्या हप्त्याची मागणी करताना गेल्या हंगामात ११०० रुपयेसुद्धा भाव मिळाला नाही अशा नाशिक, नगर आणि विदर्भमराठवाड्यातील ऊस शेतकऱ्यांनासुद्धा कारखाने बंद पाडायचा उत्साह आला पाहिजे, एवढेच नव्हे तर १९८० सालाप्रमाणे आवश्यकता तर सर्व रेल्वेगाड्या आणि रस्तेसुद्धा बंद पाडण्याचा उत्साह आला पाहिजे.
 म्हणून सगळ्या भागांतील ऊस उत्पादकांकरिता मी एक सूत्र मांडतो. ते ज्यांनी त्यांनी आपापल्या भागाला लावावे, आपल्या भागातील कारखान्याला लावावे. उसातील शर्करांशाच्या प्रत्येक टक्क्याला किमान १५० रुपये पहिला हप्ता मिळाला पाहिजे अशी आपल्या लढाईची मागणी राहील. म्हणजे जर कारखान्यांतील साखरउतारा १०% आहे तिथे उसाला १५०० रुपये आणि जेथे १२% साखर उतारा आहे तेथे १८०० रुपये प्रतिटन पहिला हप्ता मिळाला पाहिजे. यात अवाजवी काही नाही.
 गेल्या वर्षी आपण १५०० रुपयांची मागणी केली, त्यावेळी अवाजवी मागणी म्हणून सर्वांनी त्याची हेटाळणी केली; पण गेल्या वर्षी पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या तरी, एका कारखान्याने का होईना, १७०० रुपये उचल दिली. त्यामुळे, या वेळेचा आपला निर्धार असणार

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २४६