Jump to content

पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
७४]

[माझा जन्मभरचा


सुमारास; म्हणजे हरिभाअू आपटे यांच्या कारकीर्दीच्या अखेरीस . या प्रारंभाला 'केसरी' हें वर्तमानपत्र तेव्हा अुपयोगी पडण्यासारखें नव्हतें.

 (५९) पण या सुमाराला चित्रशाळेने 'चित्रमय जगत्' हें मासिक सुरू केलें, व त्याकरिता कांहीं तरी लिहावें असें सांगण्यांत आल्यावरून, मी त्यांत ओळीने तीन विनोदी लेख लिहिले. ते म्हणजे 'गीताराव ' सामाजिक चालीरीतींचा फरक' आणि 'माझी आगगाडी कशी चुकली' हे लेख मी 'आत्मानंद' या टोपणनावाने लिहिले. कारण असल्या प्रकारचे लेख नवे, आणि विशेषतः केसरीच्या संपादकाने लिहिलेले, म्हणून लोकांना ते कदाचित् आवडणार नाहीत अशी भीति वाटत होती. आणि श्री. कृ. कोल्हटकरांनी आपले सुदाम्याच्या पोह्यांचे विनोदी लेख 'विविधज्ञान विस्तारां'त लिहिले. त्यांत पावित्र्यविडंबन बेसुमार झाल्यामुळे, विनोदी लेखांविरुद्ध लोकमत बनत चाललें होतें. वास्तविक माझ्या वरील तीन लेखांत कोणाला लागण्यासारखें कांहीच नव्हतें. ते सर्वस्वी निरपवाद आहेत. ' माझी आगगाडी कशी चुकली' या विनोदी लेखाविषयीं तर रा. खांडेकर यांनीं असें लिहिले आहे की ' या लेखाचा अंतर्भाव केल्याशिवाय कोणत्याहि विनोदी लेखसंग्रहाला पूर्णता येणार नाही.' पण 'केळकर, तुम्ही असले लेख आमच्या मासिकांत लिहू नका ! दुसरें कांही वाटलें तर लिहा' असें त्या मासिकाचे मालक वासुकाका जोशी यांनी मला स्पष्ट शब्दांनी सांगितलें असें पक्कें आठवतें. पण यानंतरच माझीं नाटकें लिहून झाल्यामुळे, ललित लेखनाची हौस त्या द्वारानें थोडीशी भागली. आणि १९१९ मध्ये निवडणुकीना अुद्देशून 'म्हणा स्वराज्य मतदार की जय' हा विनोदी पण मतप्रसारक लघुलेख खुद्द टिळकांसमक्ष केसरींतच लिहून, त्या गंभीर वर्तमानपत्री मैदानांत माझें ललितकलेचें निशाण मी प्रथमच अुभारलें.
 (६०) वास्तविक 'चित्रमयजगतां'तील हे तीन लेख 'लघुकथा' नव्हेत. तसेंच लघुनिबंधहि त्यांना म्हणतां येणार नाही. तर वक्रोक्ति-लेख किंवा विनोदी चुटके (Skits) असें म्हणतां येअील. आणि याच जातीचे यापुढचे लेख म्हणजे 'श्रृंगाल -संमेलन', 'दुर्जनसिंग महाराजांची नवसफेड',