Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५७३
मराठ्यांच्या कर्तृत्वाचा हिशेब
 

तरी, येथल्या मुलखात तरी शेती व व्यापार यांची भरभराट होऊन, थोडीशी समृद्धी लोकांना पहावयास मिळाली असती.

उत्तरेचे भय
 उत्तरेकडे लक्ष न देता, दिल्लीवर स्वाऱ्या न करता, मराठ्यांना दक्षिण निर्वेध करता आली असती काय ? असा एक प्रश्न येईल. दिल्लीवर स्वारी करताना, 'मूळच छेदल्यानंतर फांद्या आपोआप खाली येतील,' असे उद्गार थोरल्या बाजीरावाच्या तोंडी घातलेले आहेत. पण 'दिल्लीला मूळच शिल्लक नव्हते,' असे या प्रवादाचे निराकरण करताना, नानासाहेब सरदेसाई यांनी म्हटले आहे, ते अगदी यथार्थ आहे. औरंगजेबानंतर दिल्लीला कर्ता असा बादशहा झालाच नाही. आणि इतर जे कोणी बलाढ्य सरदार होते त्यांची दक्षिणेवर स्वारी करण्याइतकी हिंमत खास नव्हती. आणि मुख्य गोष्ट अशी आहे की दक्षिण पूर्ण निर्वेध झाल्यावर मराठ्यांना उत्तरेकडे स्वाऱ्या करणेही फार सुलभ झाले असते. किंवा रजपूत, जाट आणि शीख यांना साह्य करून हिंदुपदपातशाहीचे स्वप्नही खरे करता आले असते. पानपतानंतर अबदाली पंजाबवर दोनतीनदा आला होता. पण १७६७ साली एकट्या शिखांनी त्याचा सडकून पराभव केल्यामुळे तो पुन्हा हिंदुस्थानात आला नाही. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता, उत्तरेचे काही भय बाळगण्याचे मराठ्यांना कारण होते, असे इतिहासाच्या आधारे, म्हणता येत नाही. म्हणूनच पुनः पुन्हा विचार मनात येतो की आपले मर्यादित कर्तृत्व ध्यानी घेऊन, मराठयांनी आपल्या सर्व शक्ती - शिंदे, होळकर, पवार, गायकवाड, भोसले, यांसह–दक्षिणेवर केंद्रित केली असती, तर साम्राज्यसत्ता, खऱ्या अर्थाने म्हणण्याजोगे साम्राज्य, त्यांना निश्चित स्थापिता आले असते.
 पण तसे त्यांनी केले नाही, एवढेच नव्हे तर त्यांच्या मनात असा काही विचारही कधी आला नाही. खरे म्हणजे राजनीतीचा सर्वांगीण विचार करून मराठ्यांचा कारभार केव्हाच चालला नव्हता. त्यांच्या अंगी काही ऊर्मी होत्या. त्यांचा जोर झाला की ते पराक्रम करीत. पण मानवी भावना, ऊर्मी, मनोवृत्ती यावर समाज, राष्ट्र, देश, काही ध्येयवाद, यांचे संस्कार करून एक नवे संघटित समाजजीवन निर्माण करावयाचे असते, या कल्पना मराठ्यांना कधी स्फुरल्याच नाहीत. तत्कालीन इतर प्रदेश व तेथील भिन्न- भिन्न जमाती यांच्यापेक्षा ते उजवे होते हे खरे. त्यामुळेच त्यांना सर्व हिंदुस्थानभर घोडदौड करता आली. त्याचा एक निश्चित फायदा झाला. अखिल भारतातील मुस्लिम सत्तेची पाळेमुळे त्यांनी खणून काढली. त्यामुळे हिंदुधर्म व हिंदुसंस्कृती जगली तरी ! मराठ्यांचे हे पराक्रम झाले नसते तर आणखी चारपाच पाकिस्ताने तरी हिंदुस्थानात झाली असती. एकट्या टिपूनेच लाखो हिंदूंना बाटविले होते. मग सर्व भारतभर मराठे मुस्लिम सत्ता निखळीत फिरत राहिले नसते तर काय झाले असते, हे सहज ध्यानात येईल. हिंदुसंस्कृती जगविणे हे काही लहान कार्य नाही. पण हिंदवी स्वराज्य, हिंदुपदपात-