Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४८२
 



दिल्लीकडे
 मोगल असे निस्तेज, हताश झालेले पाहून मराठ्यांना भलतीच उमेद चढली. औरंगजेबाचे सर्व राज्य उलथून टाकून दिल्ली काबीज करण्याची सुखस्वप्न ते पाहू लागले. १६९१ साली हणमंतराव घोरपडे यास लिहिलेल्या पत्रात राजाराम महाराजांनी काय सांगितले आहे पाहा. 'तुमचा संकल्प जाणून स्वामींनी फौज खर्चास सहा लक्ष होनांची नेमणूक करून दिली आहे. रायगड, विजापूर, भागानगर व औरंगाबाद हे चार प्रांत काबीज केल्यावर तीन लाख आणि प्रत्यक्ष दिल्ली काबीज केल्यावर बाकीचे तीन लाख, असा निश्चय केला आहे. महाराष्ट्रधर्म चालवावा. एकनिष्ठपणे सेवा करावी.'
 जिंजीस वेढ्यात अडकून पडलेला मराठ्यांचा छत्रपती हे पत्र लिहितो, हे हास्यास्पद आहे, असे क्षणभर वाटेल. पण सरदेसायांनी वारंवार लिहिले आहे की मराठ्यांची एकजूट व निष्ठा कायम असती तर यात अवघड असे काही नव्हते.

मोगल भारी नव्हते
 या पंचवीस वर्षांतील मोगली लष्कराची स्थिती, त्यांच्या सरदारांची वृत्ती आणि औरंगजेबाचा हट्टाग्रही स्वभाव यांची वर्णने वाचताना मनात येते की खरोखरच यात अववड काही नव्हते. औरंगजेबाचा एक मुलगा अकबर तर उघडपणे मराठ्यांना मिळाला होता. शहा अलमबद्दल बादशहाला तशीच शंका होती. किंबहुना बादशहाला सर्व सरदार पुत्र व नातू यांच्याबद्दल तसा संशय होता. सरदारांना कसलाच उत्साह नव्हता. कारण केल्या पराक्रमाचे बादशहा स्मरण ठेवीलच, अशी कोणालाच खात्री नव्हती. दिलेरखानने यामुळेच आत्महत्या केली. आणि शहा आलमचा मुलगा तर बादशहालाच ठार मारायला निघाला होता. शिवाय घरापासून माणसे किती दिवस दूर राहावी याला काही मर्यादाच राहिली नव्हती. दिल्ली प्रांत सोडून सतत दहा, पंधरा, वीस वर्षे, पंचवीस वर्षे मोहीमशीर राहावयाचे म्हणजे काय चेष्टा आहे ! त्यात अन्न, वस्त्र, घर यांची नित्य वानवा. आणि यावर मराठ्यांच्या भुतावळीशी गाठ. अवर्षण, अतिवर्षण, दुष्काळ, प्लेग, कॉलरा या आपत्तीही दर दोन-तीन वर्षांनी येतच होत्या. त्यामुळे नेटाने लढण्यास उत्साह कोणालाच नव्हता. तेव्हा शिवछत्रपतींच्या वेळच्या निष्ठा, जूट व ध्येयवाद टिकला असता तर मोगल हे मराठ्यांना भारी नव्हते हे सहज पटू लागते.
 त्या निष्ठा, तो ध्येयवाद यांचे काय झाले याचा विचार वर थोडासा केला आहे. पुढे आणखी करावयाचा आहे. सध्या या स्वातंत्र्यसंग्रामाचे स्वरूप आपण पाहात आहो.

जिंजी - कर्नाटक
 महाराष्ट्रात संग्राम कसा चालू होता हे वर आपण पाहिले. याच वेळी दक्षिणेस