Jump to content

पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 संस्थाश्रयी मुली व महिलांचे प्रश्न


 पार्श्वभूमी

 निराधार बालिकांच्या संगोपन, शिक्षण, सुसंस्कार व पुनर्वसनार्थ संस्थांचा आश्रय प्राचीन काळापासून घेतला जात आहे. प्रारंभीच्या काळात ऋषि-मुनींनी दयाभावनेने हे काम आपल्या पर्णकुटी, गुरुकुल इ. ठिकाणी सुरू केले. पुढे अशा प्रयत्नांना राजाश्रय मिळाला. अगदी अलीकडच्या काळाचा विचार करायचा झाला तर धार्मिक व समाज हितकारी संस्था, संघटनांनी या कामाचे पुनरुज्जीवन केले. अठराव्या शतकात रामकृष्ण मिशन, मुक्तिफौज इ. संघटनांनी अनाथाश्रम सुरू करून अनाथ, निराधार बालिकांच्या संगोपन व पुनर्वसन कार्याचा श्रीगणेशा केला. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महात्मा फुलेंनी इ. स. १८६३ पुण्यात बालहत्या-प्रतिबंधक गृह सुरू करून बालिका, कुमारी माता, परित्यक्त महिला यांच्या संरक्षण, संगोपन कार्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनीच बालिकांच्या शिक्षणाचीही सुरुवात केली. पुढे १८७५ मध्ये महाराष्ट्रातील दुसरे बालहत्या प्रतिबंधक गृह प्रार्थना समाजाने पंढरपूर येथे सुरू केले. ते सध्या वा. बा. नवरंगे बालकाश्रम या नावाने प्रसिद्ध आहे. भृणहत्येस प्रतिबंध करण्याच्या हेतूने सुरू झालेल्या महाराष्ट्रातील या दुस-या प्रतिबंधक गृहाने पुढे अनाथाश्रम, बालिकाश्रम, स्वीकारगृह, आधारगृह, अभिक्षणगृह, वृद्धाश्रम, बालसदन, अर्भकालय, बाल रुग्णालय, बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रसूतिगृह इ. योजना वेळोवेळी सुरू करून निराधार बालक, बालिका व मातांच्या संगोपन, संरक्षण, सुसंस्कार, शुश्रूषा, शिक्षण, पुनर्वसन कार्याचा विस्तार करून महाराष्ट्रातील अनाथ, निराधार बालिकांच्या कल्याण कार्यक्रमांचे एकछत्री केंद्र विकसित केले. महात्मा फुले यांनी सुरू केलेले बालहत्या प्रतिबंधक गृह बालकल्याणाची गंगोत्री म्हणून

१२८...संस्थाश्रयी मुली व महिलांचे प्रश्न