Jump to content

पान:महाराजा सयाजीराव - कृतीशील सत्यशोधक.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 फुलेंनी 'शेतकऱ्यांचा असूड' मध्ये मांडलेली भूमिका आणि व्यक्त केलेल्या अपेक्षा आपण जेव्हा सयाजीरावांच्या शेतीविषयक कार्याशी जोडून समजून घेतो तेव्हा सयाजीरावांच्या कृतिशीलतेचे मोठेपण लक्षात येते. सयाजीरावांनी १८९७ मध्ये स्वतंत्र शेती खाते सुरू केले. शेतीसाठी पाणी, अवजारांबरोबरच कृषिविषयक प्रगत ज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. 'कृषीकर्मविद्या' हा ६०० पानांचा ग्रंथ १८९८ मध्ये प्रकाशित केला. बँक ऑफ बडोदा आणि विविध सहकारी पतपेढ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले. संस्थानाच्या वतीने १२,००० विहिरी खोदल्या. संस्थान आणि शेतकऱ्यांच्या संयुक्त मालकीचा गणदेवी हा आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना १८८५ ला सुरू करून भारतात कृषी औद्योगिक क्रांतीचा पाया घालतात. शेती विकासासाठी ४२ प्रकारच्या सहकारी संस्थांमार्फत 'कृषी सहकारा'चा मानदंडही निर्माण करतात. हे सर्व प्रयत्न म्हणजे फुल्यांच्या शेतकरी कल्याण कार्यक्रमाचाच परिपूर्ण विकास आहे.

 फुल्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून पाहिलेल्या स्वप्नांचा सयाजीरावांनी फुलेंच्या कल्पनेपलीकडे विस्तार केल्याचे शेकडो पुरावे मिळतात. धार्मिक विधी, संस्कृत ग्रंथांचे मराठी अनुवाद, अस्पृश्यांसह सर्व जातीच्या लोकांना मोफत संस्कृत शिक्षण, पाश्चात्य संस्कृतीचा परिचय करून देणारे ग्रंथ प्रकाशन, ग्रंथालय चळवळ, सक्तीच्या आणि मोफत

महाराजा सयाजीराव: कृतीशील सत्यशोधक / १०