पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धार्मिक सुधारणा

 १८७५ ला बडोदा गादीला दत्तक गेल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत १८७७ ला वयाच्या १४ व्या वर्षी सयाजीरावांनी धर्मसुधारणेच्या क्षेत्रात पाऊल टाकले. १८७७ मध्ये अहमदाबाद येथे अस्पृश्यांसोबत सहभोजन करून महाराजांनी आपल्या क्रांतिकार्याला सुरुवात केली. १८८१ मध्ये सयाजीरावांच्या हाती प्रत्यक्ष राज्यकारभारची सूत्रे सोपविण्यात आली. राज्यकारभार हाती आल्यानंतर दुसऱ्याच वर्षी म्हणजे १८८२ पासून महाराजांनी आपला धर्म साक्षरतेचा कृतिकार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली. १८७५ ते १८८१ या सहा वर्षांच्या औपचारिक शिक्षणादरम्यान महाराजांमध्ये धर्माकडे बघण्याचा तटस्थ दृष्टिकोन निर्माण करण्यात इलियट सरांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्या काळात नोकर लोकांमध्ये व्यसनाधीनता, बेशिस्त, मंत्र-तंत्र, अनुष्ठाने, अपशकुन यांचा अधिक प्रभाव होता. त्यावर प्रचंड खर्च होत असे. महाराजांनी आपल्या धोरणानुसार एकदम हुकूम काढून हे प्रकार बंद न करता हळूहळू लोकांची समजूत घालून हे सर्व कमी करण्यास सुरुवात केली. १८८२ मध्ये त्यांनी राजवाड्यातील खानगी कारभाराला शिस्त लावण्यास सुरुवात केली. यात मुख्यत: मिळकत, सामान खरेदी, देवघेवीचे व्यवहार यासारख्या बाबींचा समावेश होता. खानगी कारभारला शिस्त लावणे हा त्यांच्या धर्मसुधारणेतील पहिला टप्पा होता.

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / ८