पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खर्च करण्यात येत आहे. या संस्थेवर चांगली देखरेख ठेवून विद्यार्थ्यांना तीत दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा लाभ चांगल्या प्रकारे मिळू शकेल अशी काळजी ठेविली पाहिजे. या संस्थेचा लाभ अमुक एका जातीलाच न मिळता हिंदूतील सर्व जातींना मिळाला पाहिजे आणि या उद्देशाने हल्ली दिल्या जात नसलेल्या जातींना पाच-पाच रुपयांच्या दहा शिष्यवृत्या ठेवून त्या अशा इतर जातींच्या विद्यार्थ्यांना देण्यात याव्यात. या योजनेचा उद्देश ब्राह्मणवर्गाला हानिकारक नसून त्याला लाभकारकच आहे.'

 सयाजीरावांनी आपल्या कारकिर्दीत भारताच्या शेकडो वर्षांत ज्या सुधारणा होऊ शकल्या नाहीत त्या सुधारणा अनेक क्रांतिकारक निर्णयांच्या माध्यमातून केल्या. असाच एक निर्णय म्हणजे हिंदू धर्मातील सर्व जातींना संस्थानी खर्चाने संस्कृत शिकवण्याची केलेली सोय होय. सयाजीरावांनी वेदाभ्यास हा सर्व जातींचा अधिकार आहे ही भूमिका घेत अस्पृश्य व ब्राम्हणेतरांसाठी संस्कृत पाठशाळा सुरू केली. ७ मार्च १९१५ रोजी बडोद्यात संस्कृत पाठशाळेची स्थापना करण्यात आली. या संस्कृत पाठशाळेत धर्मांच्या तौलनिक अभ्यासासाठी संस्कृतबरोबरच इंग्रजीचे शिक्षण देण्याचीदेखील व्यवस्था करण्यात आली होती. या पाठशाळेत हिंदू धर्मातील सर्व जातींना प्रवेश देण्याबरोबरच ज्या जातींना संस्कृत ज्ञानाचा लाभ मिळत

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / २७