पान:महाराजा सयाजीराव आणि श्रीधर व्यंकटेश केतकर.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणतात, “महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या २००० रुपये किमतीच्या प्रती सयाजीरावांनी विकत घेतल्या होत्या.” महाराजांनी केलेली २,००० रु. ची ही आर्थिक मदत आजच्या रुपयाच्या मूल्यात ५६ लाख ३४ हजारांहून अधिक भरते.
 केतकरांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाची संक्षिप्त आवृत्ती म्हणून गुजराथी ज्ञानकोशही तयार केला. सयाजीराव ज्या बडोद्याचे राजे होते तेथील प्रजेची मातृभाषा गुजराथी असल्यामुळे या कोशाचे काम सुरू असल्याचे कळताच या कोशालाही कोश प्रकाशित होण्याअगोदर आर्थिक साहाय्य केले. या संदर्भात कर्वेची नोंद महत्त्वाची आहे. कर्वे लिहितात, “डॉ. केतकर तयार करत असलेल्या गुजराथी ज्ञानकोशाला आगाऊ ५००० रुपये विद्याखात्यातर्फे देण्यात आले." आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम १ कोटी ३९ लाख रु.हून अधिक भरते. मराठी आणि गुजराथी ज्ञानकोशासाठी सयाजीरावांनी केतकरांना केलेले आर्थिक साहाय्य आजच्या रुपयाच्या मूल्यात १ कोटी ९६ लाख रु. इतके भरते.

 अमेरिकेतील शिष्यवृत्तीचा उल्लेख ज्याप्रमाणे केतकरांनी त्यांच्या 'द हिस्ट्री ऑफ कास्ट इन इंडिया' या प्रबंधाच्या प्रस्तावनेत केलेला नाही तसाच या मदतीचादेखील उल्लेख ज्ञानकोशाच्या प्रस्तावनेतही केला नाही. केतकरांच्या 'माझे बारा वर्षांचे काम ऊर्फ ज्ञानकोशमंडळाचा इतिहास' या ग्रंथातही महाराजांनी केलेल्या मदतीचा उल्लेख आढळत नाही हे

महाराजा सयाजीराव आणि श्रीधर व्यंकटेश केतकर / १६