Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 महात्मा गांधींच्या या आंदोलनास बडोदा राज्यातून मिळणाऱ्या पाठिव्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना १६ एप्रिल १९१९ रोजी पाठवलेल्या पत्रात ब्रिटिश पोलीस कमिशनर लिहितात, "रौलट ॲक्टविरुद्ध महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या सत्याग्रहात बडोद्यातील अमरेली येथील ३०० लोकांनी भाग घेतला. १२ आणि १३ एप्रिल, १९१९ रोजी गांधींच्या अटकेच्या बातमीने अमरेलीतील ६० विद्यार्थ्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. गांधींची सुटका व्हावी म्हणून प्रार्थना सभा झाली. यावेळी ५०० माणसे उपस्थित होती. दिनांक ६ रोजीची सभा बोलावणाऱ्या निमंत्रकांमध्ये नगरशेट त्रिभुवन परमानंद, राजरत्न हिरालाल गोविंदजी वकील, चतुर्भुज जगजीवनदास वकील, जमनादास वामनजी वकील, सेठ त्रिभुवन मोतीचंद, सेठ सुलेमान अटबी, सेठ अमर दादा, सेठ मुसा महम्मद, सेठ म.सा.अब्राहम होते, त्यांची नावी रणोदय प्रेस', अमरेली इथे छापलेल्या पत्रकात समाविष्ट होती. या लोकांना इशारा दिला की, चळवळीमुळे होणाऱ्या कोणत्याही अनिष्ट परिणामांना ते जबाबदार असतील; आणि रौलट विधेयक त्यांना मुंबई प्रांतातील लोकांना लागू होईल. त्याचप्रकारे हायस्कूलच्या हेडमास्तरांनीही आपल्या विद्यार्थ्यांना समज द्यावी.”

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / ३७