पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चांगले आहे नाही हे आम्हाला कळते.” सयाजीराव आणि रेसिडेंट यांच्यातील हा शाब्दिक वाद सयाजीरावांचा ब्रिटिश सत्तेविरुद्धचा राग व्यक्त करणारा आणि आम्ही तुमचे मांडलिक नसून सार्वभौम राजे आहोत हे सूचित करणारा आहे.

 न्यायमूर्ती गोविंद महादेव रानडे आणि बाळ गंगाधर टिळक या राष्ट्रीय नेत्यांशी महाराजांचे जवळचे संबंध होते. सयाजीराव आणि टिळकांची भेट १८९० मध्ये झाली. बापट प्रकरणानंतर १८९४-९५ ला ती अधिक वृद्धिंगत झाली. या प्रकरणात बाळ गंगाधर टिळकांनी बापटांची बाजू सांभाळून महाराजांना एक प्रकारे मदतच केली आहे. सयाजीरावांनी पुण्यातील आपला गायकवाड वाडा टिळकांच्या केसरी, मराठा वृत्तपत्रास भेट देण्याचे ठरवले; परंतु या गोष्टीला रेसिडेंट यांनी विरोध केला. शेवटी इंग्रजांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी कागदोपत्री व्यवहार दाखवून सयाजीरावांनी हा वाडा टिळकांना भेट दिला. आज हाच वाडा टिळकांचा केसरी वाडा म्हणून ओळखला जातो.

खासेराव जाधव

 सयाजीरावांनी १८८४ मध्ये आपले नातेवाईक खासेराव जाधव यांना कृषिक्षेत्रातील उच्चशिक्षणासाठी लंडनला पाठवले. त्यावेळी खासेरावांची लंडनमधील इंडिया हाउसच्या श्यामजी कृष्ण वर्माशी ओळख झाली. 'इंडिया हाउस' हे ब्रिटिश सरकारविरुद्ध चळवळीचे आणि देशप्रेमी भारतीयांचा गट समन्वित करण्याचे ठिकाण होते. याबरोबरच 'इंडियन मजलिस'

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / १५