पान:महाराजा सयाजीराव आणि बालगंधर्व.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



महाराजांचे गायन परिषदेतलं भाषण

 इ.स. १९२९, १० मार्च रोजी बडोदे येथील राजवाड्याच्या विशाल दिवाणखान्यात गायन परिषद भरली होती. त्यावेळी महाराजांना ऐनवेळी भाषण करण्याबद्दल विनंती करण्यात आली होती. त्यांनी त्यावेळेस आपले विचार थोडक्यात मांडले होते. या भाषणात त्यांनी आपण संगीत कलेसाठी आजपर्यंत कोणते प्रयत्न केले याविषयी सांगितले. पण माझ्या प्रयत्नांना पाहिजे तसे यश आलेले नाही याला दोन कारणे आहेत असे ते म्हणाले. एक म्हणजे, आपल्याकडील संगीतज्ञांना आपले स्वतःचे ज्ञान लपवून ठेवण्याची आणि आपल्या पट्टशिष्यांनाही ते न देण्याची असलेली सवय हे होय. दुसरे कारण असे की, इकडच्या लोकांची आपल्या आयुष्यांत सात्त्विक आनंदाचा पूर्ण उपभोग घेण्याची प्रवृत्ती फार कमी आहे हे होय. याला आपल्या इकडचे दारिद्रय, औद्योगिक क्रांती वगैरे गोष्टी बऱ्याच अंशी कारणीभूत असल्या, तरी आपला नित्याचा उद्योग अधिक चांगल्या रीतीने करता येण्यास संगीताचा फार उपयोग होतो, या दृष्टीनेही त्या कलेचे ज्ञान संपादन करणे व त्याच्याबद्दल आपली अभिरुची वाढविणे अवश्य आहे, असे महाराजांनी सांगितले.

महाराजा सयाजीराव आणि बालगंधर्व / २०