Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सयाजीरावांची प्रेरणा आणि पाठबळ असल्यामुळे अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या पहिल्या दोन अधिवेशनाचे (१९०७ व १९०८) अध्यक्ष खासेराव जाधव होते. वि.द. घाटेंच्या म्हणण्यानुसार खासेराव हेच मराठा शिक्षण परिषदेच्या बैठकीचे ठिकाण, दैनंदिन व्यवस्थापन तसेच इतर मुख्य निर्णय घेत असत. १९०९ च्या तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष महाराजांचे लहान बंधू संपतराव गायकवाड होते. १९१० चे चौथे अधिवेशन बडोद्यात भरले होते. पहिल्या अधिवेशनाप्रमाणे पुन्हा एकदा या अधिवेशनाचे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती सयाजीरावांना करण्यात आली. परंतु बडोद्यातच हे अधिवेशन होत असल्यामुळे माझ्याच गावात मी अध्यक्ष होणार नाही अशी भूमिका सयाजीरावांनी घेतली. त्यामुळे मालेगावचे शंभूसिंह राजे जाधवराव यांना या अधिवेशनाचे अध्यक्ष करण्यात आले.

 या अधिवेशनात जनरल फंड निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी महाराजांनी या फंडासाठी १ लाख २५ हजार रुपये दिले. बडोद्याचे माजी दिवाण रामचंद्र धामणस्कर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या पत्नीने ७५ हजार रुपयांचा निधी दिला. या सगळ्याचा एकत्रित विचार करता फक्त बडोद्यातून १९१० मध्ये मराठ्यांच्या शिक्षणासाठी ३ लाख २५ हजार इतका निधी उभा राहिला. हा आकडाच मराठ्यांच्या उत्कर्षातील सयाजीरावांचे योगदान सांगून जातो. एकंदरीत मराठा शिक्षण परिषदेच्या कामासाठी खासेरावांनी घेतलेली मेहनत सर्वाधिक

महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव / २०