Jump to content

पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विवेचन तिसरे. ह्या १७५० सालापासून हिंदुपदबादशाहीच्या ऐवजी ब्राह्मणपदवादशाहीचें नांव नव्यानेच ऐकू येऊ लागले. सातारच्या महाराजांचे प्रस्थ ह्या सालापासून अगदीच मावळलें व पेशवे मराठमंडळाचे मुख्य झाले. ही क्रांति कशी घडून आली तें ह्या विवेचनांत स्पष्ट करितों. शाहूराजाच्या मृत्यूनंतर १७५० च्या जानेवारीपासून पुढे सर्व हिंदुस्थान व सर्व दक्षिण महाराष्ट्रमय करण्याचा प्रयत्न बाळाजीनें केला व सदाशिव चिमणाजी तर खुद्द रूमशामची सरदेशमुखी पटकविण्याच्या गोष्टी बोलू लागला. १७५० पासून १७६१ पर्यंतच्या ११ वर्षांतील बाळाजी बाजीरावाच्या धोरणाचें खाली लिहिल्याप्रमाणे पृथक्करण करितां येते. (अ) हिंदुस्थानांत पश्चिमोत्तर दिशेनें उत्तर रजपुताना, अंतर्वेद, रोहिलखंड, मुलतान, लाहोर, ठठा व भकर ह्या प्रांतांत अंमल बसवावयाचा (लेखांक १). (ब) हिंदुस्थानांत पूर्वेकडे काशी, प्रयाग, अयोध्या, बंगाला इत्यादि प्रदेशांवर मोहीम करावयाची ( काव्येतिहाससग्रह, पत्रे व यादी ३६२, ३७३, ३८७, ३८८. प्रस्तुत ग्रंथांतील लेखांक ३१, ३७, ३९ इत्यादि ). (क) दक्षिणेत पूर्वेकडे सलाबतजंगाचा प्रदेश घ्यावयाचा; ऐन कर्नाटकात श्रीरंगपट्टणाला हिंदुराजांच्या ताब्यांत तें होतें तोपर्यंत अंकित करून टाकावयाचें व पुढे मुसुलमानांच्या ताव्यांत गेल्यावर जिंकून घ्यावयाचें. (ड) कोंकणांत सुरत, जंजिरा वगैरे ठिकाणे खालसा करावयाची. ( ई ) खुद्द महाराष्ट्रांत सातारची व कोल्हापुरची गादी एक करावयाची (फ) आणि सरदारांची व्यवस्था लावावयाची. येणेप्रमाणे बाळाजी बाजारावाच्या राजनीतीचे धोरण सहाप्रकारचे होते. पैकी (अ), ( ब ), ( क ), (ड) आणि (फ) ह्या प्रकारांची माहिती ह्या पुस्तकांत, काव्यतिहाससंग्रहांत व ऐतिहासिकलेखसंग्रहांत छापलेल्या पत्रांतून बरीच आली आहे. त्यावरून त्यावेळच्या महाराष्ट्रमत्सद्यांच्या मनात काही विशिष्ट हेतु होते व तत्सिद्धयर्थ त्यांचे व्यवस्थित प्रयत्न चालले होते हे स्पष्ट दिसून येईल. पश्चिमोत्तर दिशेकडील प्रदेश दिल्लीच्या पातशहाने १७५० त मराठ्यांना बहाल करून टाकिलें. तेव्हां १७६१ पर्यंत त्यांत अंमल बसविण्याचा उद्योग करणे त्यांना अवश्यच झाले होते. लेखांक १ त अबदालीला तंबी देण्याचे वचन मराठ्यांनी १७५० त पातशहाला दिले होते. तेव्हापासूनच अबदालीचा व मराठ्यांचा सामना होणार हे ठरून गेल्यासारिखें होते. रघुनाथरावाने १७५८ त लाहोर घेतले, त्यामुळे अबदाली चवताळला व मराठयांच्या अंगावर पानिपतचा घोर प्रसंग आला असें ग्रांटडफ् ह्मणतो, ते फारसें विश्वसनीय नाही. हे १७-०तच अबदालीला तंबी देण्याचा मराठ्यांनी पत्कर घेतला होता ही गोष्ट ध्यानांत धरिली ह्मणजे कळून येईल व रघुनाथरावाला विनाकारण दोष देण्यांत अर्थ नाही अशी खात्री होईल. पूर्वेकडील काशी व बंगाला हे प्रदेश घेण्याचा बाळाजीचा १७४२ पासूनच प्रयत्न चालला होता. १७४७ त स्वतः बाळाजी काशीत जाऊन आला. १७५२च्या डिसेंबरांत भालकीचा तह झाल्यावर जयाप्पा १७५३च्या मेंत हिंदुस्थानांत