पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३१६ )

प्रजेस अतीशय उपद्रव देत, ता. ८ जुलई ( इ० सन १७५८) रोजी, तंजावर येथे येऊन दाखल झाला. त्याबरोबर प्रतापसिंहास दहशत बसून तो लालीस पांच लाख रुपये देण्यास तयार झाला. पण लालांच्या उतावळेपणाने सर्व फसले. त्यास थोडासा विजय प्राप्त झाल्याबरोबर " राजास त्याच्या सर्व माणसांसह कैद करून सेंट लुई येथे घेऊन जाऊं " अशी लालीनें प्रतापसिंहास निष्ठुरपणाची धमकी दिली. त्याबरोबर राजा प्रतापसिंह चिडून गेला; जिवावर उदार झाला; " काय होईल तें होवो; ' अशा निर्धारानें त्यागें फ्रेंचाश सामना देण्याचा निश्चय केला; फ्रेंच सैन्याशीं निकराचे युद्ध सुरू केले. पुढे तंजावरवर फ्रेंच तोफा डागणार, तोफांच्या जोराच्या येलगारांत तंजावर शहर हस्तगत करण्याचा प्रयत्न करणार तोच, इंग्रजांचें सैन्य प्रतापसिंहाच्या मदती- करितां तंजावर येथे येऊन दाखल झालें; व कांही इंग्रजी आरमार कारीकल व पांडेचरी घेण्याकरितां तिकडे गेले आहे, अशी लालो यांस बातमी समजली. तेव्हां त्यास कसाबसा जीव बचावून तंजावर सोडून, कारीकल- पांडेचरीकडे जाणे भाग पडले, तंजावरच्या ह्या वेढ्यामध्ये, व युद्धप्रंसगी तंजावरकर सेना- पति व दिवाण मानाजीराव यानें उत्कृष्ट कामगिरी केली, व आपल्या परा क्रमानें फ्रेंच सरदार लाली यांस आश्चर्यचगित करून टाकिलें. इतकेच नाहीं तर लाली हा तंजावर येथून परत जाण्यास निघाल्यानंतर, मार्गात तंजावर कराच्या सैन्यानें लालीस इतका त्रास दिला कीं, तो स्वतःच जिवंत तंजावर करांच्या हातांत सांपडण्याचा कठिण प्रसंग त्याच्यावर गुदरण्याची वेळ आली होती; पण मोठ्या शर्थीने ती टळून तो बचावला. तथापि तीन मोठाल्या तोफा, त्यांत खिळे ठोकून त्या निरोपयोगी करून, त्यास रस्त्यांत टाकून द्याव्या लागल्या; व मोठ्या शिकस्तीनें तो कसा तरी पांडेचरी येथें परत गेला, व तंजावरवरील दें फ्रेंचाचें अरिष्ट अशा प्रकारें दूर झाले.

 त्यानंतर इ० सन १७६१ मध्ये कर्नाटकमधील फ्रेंच सत्ता पूर्ण कमजोर होऊन ती बहुतेक लयास गेल्यासारखी झालो; आणि इंग्रज व त्यांचा दोस्त महंमद- अली हे सर्वसत्ताधारी व प्रबळ झाले; व ते उभयतांही तंजावरच्या राजास आपला अंकित करून घेण्याची इच्छा करू लागले. शिवाय याच वेळी नबाब महंमदअल्लो हा कर्नाटकमधील युद्धामुळे इंग्रजांचा देणेदार होऊन कर्जाच्या