Jump to content

पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी




मराठी लेखनशुद्धी : भूमिका

 मराठी शुद्धलेखनाच्या संदर्भात मराठीकरणाच्या हाती घेतलेल्या मोहिमेमुळे अलिकडे शुद्धलेखनावर काही पुस्तके लिहिली गेली आहेत. तथापि शुद्धलेखन हा विषय सोप्या भाषेत तपशिलवारपणे विपुल उदाहरणांसह उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे नित्योपयोगी प्रशासकीय कार्यालयीन, लेखा विभागासाठी उपयुक्त अशा प्रतिशब्दांचाही वापर रुजविणे आवश्यक आहे. या दोन्ही हेतूने या पुस्तकात मराठी शुद्धलेखनाचे नियम सोप्या भाषेत समजावून सांगितले आहेत. त्यासाठी भरपूर उदाहरणांचा खजिना खुला केला आहे.
 नित्योपयोगी इंग्रजी शब्दांना लागणाऱ्या प्रतिशब्दांची सूची ही स्वतंत्रपणे त्यात मुद्दाम समाविष्ट केली आहे. त्यातही विशेषतः काही स्वतंत्र इंग्रजीला पर्यायी असे मराठी पारिभाषिक शद खास मुद्दाम तयार करुन सुचविले आहे, हे करताना मराठी धाटणी लक्षात घेतलेली आहे.
 मराठीकरणाची प्रक्रिया अद्यापही मूळ धरू शकत नाही. याचे महत्त्वाचे कारण मराठी लिहिणाऱ्यांना वा अक्षर जुळणी करणाऱ्यांना शुद्धलेखनाबद्दल खात्री नसते. इंग्रजी जसे मागील तयार जुन्या फाईलीवरुन पुढे चालू ठेवता येते, तशी मराठीत अजुन तरी सोय नाही. मराठी मातृभाषा असणाऱ्यांचीही हीच अडचण आहे. चर्चा करून शुद्ध लेखनातील चुकांची दुरुस्ती करुन घ्यावी अशी माहीतगार माणसेही बहुधा आढळत नाहीत. आणि म्हणून स्वत:च जाणीवपूर्वक शुद्धलेखनावर लक्ष केंद्रीत करून ते सुधारणे आवश्यक आहे. त्याचा मार्ग या पुस्तकाने सुलभ होईल असे वाटते.

 शुद्धलेखन ही मुळात तशी अवघड गोष्ट नाहीच पण व्याकरण आणि शुद्धलेखन म्हटले की त्याचा आपल्याला धाक वाटतो. पण थोडे मनावर घेतले, काळजी पूर्वक नियम लक्षात घेतले, विरामचिह्ने लक्षात घेतली की, शुद्ध लेखन करता येते. जाणकाराला

०९...