Jump to content

पान:मनतरंग.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 काटेरी उन्हाच्या बाभळी आता चांगल्याच पेटायला लागल्या आहेत. आणि त्या ज्वालांच्या आगीत परीक्षांच्या काहिलीची भर, हातात अभ्यासाच्या विषयाचे पुस्तक... म्हणजे दोन तासात पासिंगची गॅरंटी'. 'वाचा, लिहा नि पास व्हा' वगैरे दोस्त, हातात घेतले की डोळे पेंगुळतात. झोप अक्षरशः डोळ्यातून वाहू लागते. मग आई नाहीतर बाबा येतात. हलवून जागं आणतात. अशा वेळी आपण अगदी सहजपणे डोळे उघडतो नि सांगतो,
 "छे छे, जागीच आहे मी. किंवा जागाच आहे मी. जरा मनन करीत होतो. सर म्हणाले, एकदोन पानं वाचत जा. नि त्यावर चिंतन करत जा, म्हणून चिंतन करीत होतो..."
 बहुतेक मध्यमवर्गीय घरातली ही कथा. जिथे आई-बाबांची पाखर आहे. दोन वेळेला कौतुकाने, मनाजोगे जेवायला मिळते तिथली. जरा आणखीन पुढे जाऊया. एखाद्या महाविद्यालयाचे गरीब विद्यार्थ्याचे वसतिगृह. नाहीतर अगदी गल्लीबोळातले पत्र्याचे घर. जिथे ग्रामीण भागातील चारसहा मुलं एक चूल मांडून राहतात. गावाकडून पीठमीठ घेऊन यायचे. हातानेच भाकऱ्या थापायच्या. चटणी, कांदा आणि पाण्याबरोबर पोटात ढकलायच्या. यांच्या त्यांच्या नोटस् मागून

काटेरी मौसम/१०९