Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/७८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 कोकणस्थ ब्राह्मण समाजातील 'बोडण' -
 सुमारे ऐंशी टक्के कोकणस्थ ब्राह्मण समाजाची कुलदेवता अंबाजोगाईची योगेश्वरीदेवी आहे. ही देवी कुमारी आहे. या समाजात विवाह, मौंज, वास्तुशांत या सारखे महत्त्वाचे विधी घरात संपन्न झाल्यानंतर, तसेच नवस बोलल्यास बोडण भरण्याचा विधी केला जातो. त्यात 'कुमारिका' महत्त्वाची असते. बोडण शुक्रवारी वा मंगळवारी-देवीच्या वारी भरतात.ज्या घरी बोडण भरायचे त्या घरी तीन सवाष्णी

बाहेरच्या, एक सवाष्ण घरची आणि एक कुमारिका बाहेरची म्हणजे दुसऱ्या घरची बोलावतात. त्या घरी आल्यावर तुळशीला पाणी घालून, तुळशीजवळ त्यांचे पाय धुतात. हळदीकुंकू देऊन ओटी भरतात. प्रथम पाय धुऊन ओटी भरतात ती कुमारिकेची. त्यानंतर सवाष्णींची. त्या घरात आल्यानंतर बोडण भरण्यास सुरुवात होते. परातीत अन्नपूर्णा मधोमध ठेवतात. त्यावर कणकेचे पाच दिवे लावतात. कुमारिका महत्त्वाची असते. या परातीत एकेक वाटी दूध, दही, तूप, साखर आणि मध ओततात. घरची प्रमुख सुवासिनी अत्यन्त नम्रतेने कुमारिकेस विचारते 'देवी, आणखीन काय पाहिजे?' ती या पाच पदार्थांपैकी मागेल तो पदार्थ त्यात-परातीत टाकायचा. मग सगळ्या जणी पदार्थ एकत्र करून कालवायला लागतात. मायलेक, सासूसून सवाष्णी म्हणून एकत्र बसत नाहीत. तसेच कुमारिका दुसऱ्या घरचीच

भूमी आणि स्त्री
७३