पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/252

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

संग्रहाचा संकल्प झाला तरी पाहता-पाहता चार वर्षे लोटली होती. कार्य व संकल्प यात जसे अंतर असते तसेच संकल्प आणि सिद्धीतही! सत् संकल्प क्वचितच सहज सिद्ध होतात. या पार्श्वभूमीवर आज दोन दशकानंतर या स्मारक ग्रंथाच्या पुनर्प्रकाशनाचे औचित्य काय असा प्रश्न पडणे स्वाभाविकच म्हणावे लागेल.
 गेल्या दोन दशकात पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेलं आहे. देशप्रेम म्हणजे काय हे कानी-कपाळी ओरडून सांगितलं तरी नव्या पिढीच्या गळी ते उतरत नाही. कारण आजूबाजूला सर्वत्र स्वार्थाचा बुजबुजाट आहे. सेवाधर्म नावाची गोष्ट स्वातंत्र्यपूर्व काळातील पिढीत होती. कारण त्यांच्यापुढे लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी छ. शाहू महाराज, महर्षी कर्वे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य प्रेरणा व आदर्श म्हणून होते. स्वातंत्र्योत्तर काळात अन् विशेषतः आणीबाणीनंतर (१९७५) राजकीय घसरण झाली. राजकारण जगण्याचे साधन झाले. सेवा शब्द इतिहास जमा झाला. मेव्याची दुकाने सुरू झाली (आता तर त्याचे मॉल्सही झालेत!) जागतिकीकरणाच्या रेट्याने माणसास महत्त्वाकांक्षेच्या रेसकोर्सचा कायम जिंकू इच्छिणारा गतिमान घोडा जसा बनवले तसाच व्यक्तिगत जीवनात तो स्वतःच्या स्वार्थाभोवती फिरणारा मतलबाच्या घाण्याचा डोळ्यावर झापड बांधलेला बैलही झाला. कल्पनेत उत्तुंगतेमुळे व गतीमुळे घोड्यास समाजजीवनात आपल्या पलीकडचं दिसत नाही व । घरी तर तो सर्वांत असून एकटाच! अशा सामाजिक शोकांतिकेच्या पार्श्वभूमीवर दलित मित्र तांबट काकांचे जीवन व कार्य नव्या पिढीपुढे आले तर त्यांची स्वार्थ गती मंदावेल व ते डोळे उघडून आपल्या पलीकडचं संवेदनशीलपणे व सहभाव, समभाव आणि सहानुभूतीने पाहू लागतील असे वाटल्यावरून हे पुनर्प्रकाशन योजले असावे व ते प्रसंगोचितच म्हणावे लागेल.
 दलित मित्र तांबट काकांचे मूळ नाव लक्ष्मण रावजी ठोंबरे. त्यांचा जन्म सन १८९९ चा. एकोणिसाव्या शतकात जन्मलेल्या या सत्परुषाने दोन शतके पाहिली. तसा सहस्त्रचंद्र दर्शनाचा योग लाभलेले गृहस्थ. सहावीपर्यंतचं अल्प शिक्षण. वडिलोपार्जित व्यवसाय शोभेची दारू तयार करण्याचा. पण या माणसास काळाचं पक्क भान होतं. घरी, दारी, बाजारी शोभेच्या दारूची आतषबाजी आपण दिवाळी, दसरा, लग्न, मुंजीत करतो, पण हा काळ पारतंत्र्याचा आहे. शोभेची दारू सुरुंगाची बनवून या गृहस्थाने


प्रशस्ती/२५१