पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/216

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याला विकास तरी का नि कसे म्हणायचे? हा यक्षप्रश्न केवळ न सुटलेला, न सोडवता येणारा. म्हणून या कविता वाचायला हव्यात.

 ‘पैंजण' संग्रहात प्रेम, प्रणय, अश्रू, हास्य, करुण, शृंगार, भक्ती असं भाव, रसांचे मिश्रण आहे. कवीचं काळीज नेहमी हरिण काळीजच असतं. “माझं काळीज' मध्ये कवी प्रियतमेस ते बहाल करून टाकतो भोपळ्याप्रमाणे नि तिला कोड्यात टाकतो. विळा नि भोपळा तुझ्या हाती बहाल केलाय, तूच ठरव म्हणणारा कवी प्रेयसीच्या अंगणात आपला चेंडू टाकून रिकामा होतो. या नि अशा अनेक कवितांमधून या कवीचा खिलाडूपणा दिसतो. ती खरे तर आहे त्याची जगण्याची शैली. क्रांतिसूर्य' मध्ये स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या देशप्रेमाची प्रशंसा आहे. नवीन' कविता द्वयर्थी कवितेचं आणखी एक उदाहरण म्हणून पाहता येते. आवळा, आंबा, चिंचा या लघु फळांना आपल्या संस्कृतीत पिढ्यान्पिढ्या एक मुरलेला दर्प नि । दरवळ आहे. 'दे सर्वांना' ही कविता कवीने सर्वांसाठी वाहिलेलं अर्थ्य होय. काही कविता व्यंगाने भरलेल्या म्हणून मार्मिक ठरल्या आहेत. ‘भारूड' या संदर्भात लक्षात राहते. पैंजण' नाव असलं तरी लावणी, भारुडाबरोबर यात भजन ही वाचावयास मिळतं. रहाट गाडगं', 'झाडाझडती अशा समर्पक शीर्षकांच्या कविता नावातच सारं काव्य व्यक्त करताना आढळतात. | कवी महंमद नाईकवाडे यांचा ‘पैंजण' काव्य संग्रह एका साध्या, भोळ्या कवीच्या जगण्याचे प्रतिबिंब होय. या संग्रहातील प्रत्येक कविता जगण्याचा नवा रंग, ढंग घेऊन येते. ती जगण्याचे सारे ताल, सूर, नाद, रस, गंध व्यक्त करीत असल्याने ही कविता जगणं समजावत न बोलता समाजाच्या अन्याय, अत्याचार, शोषण, विषमतेचा पाढा वाचत वाचकास वंचितांप्रती संवेदनशील बनवत कृतिप्रवण होण्यास भाग पाडते. हेच या काव्याचं बलस्थान होय. या पैंजणात केवळ सुंगरांची किणकिण नाही तर टाळ, मृदंगाचा नाद नि फेर आहे. म्हणून ही कविता वाचायची.

◼◼

दि. २५ ऑक्टोबर, २०१७

प्रशस्ती/२१५