पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/110

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

देता म्हणजे काय उपकार करता का? जमत नाही तर जन्म का दिला? तुमची कष्ट, गरिबीची कॅसेट ऐकून कंटाळा आला... हे रोजचे संवाद घर, कुटुंब उद्ध्वस्त करत गेले. उद्ध्वस्त धर्मशाळातील प्रश्नांकित प्रवासी... त्यांना डॉक्टर...' औषधं देणारा, समुपदेशन करणारा अनिवार्य वाटू लागला. जगण्यातील गुंतागुंत सोडवायची तर मनातली घुसमट कोंडमारा व्यक्त व्हायला हवा. प्रतिष्ठेच्या बुरख्याआड किती गुदमरायचं... दारं बंद करून किती दिवस सोसत राहायचं... तोंड दाबून बुक्क्यांचा मार असह्य होऊन माणसं आपलं दबलं दुःख डॉक्टरांकडे ओकू ... व्यक्त करू लागली. ‘डॉक्टर हा संयमी श्रोता असायला हवा...' हा सिद्धांत रोजचा व्यवहार बनला. त्या सर्वांच्या कथा... गोष्टी... कहाण्या... झाल्या. त्यांचंच नाव आहे ‘गोष्टी : समुपदेशनाच्या.'
  तन्मय नि सायली भाऊ-बहीण. मोठी होतात तशी एकमेकांचे वैरी बनू लागतात. कारण काय, तर आई-वडिलांचा मुलगा-मुलगी म्हणून दुजाभाव. उत्कर्षचे आई-बाबा दोघे मिळवते. घरात अतिरिक्त पैसे. चैनीची चंगळवादी जीवनशैली. वाढता पैसा... प्रलोभन उत्कर्षला उचल्या बनवते. 'सॉरी म्हटलं की संपतं' चा फॉर्म्युला नातं संपवतो. ऋचा चटपटीत खाण्यास चटावलेली. तिला घरची पालेभाजी ओकारी आणते पण जंकफूड आणते ढेकर... रियाच्या बाबांनी जमदग्नी स्वभावामुळे नोकरी गमावली. घरी रोज ओढाताण. आई-बाबांच्या घटस्फोटामुळे भीतीच्या सावलीत जगणारी रिया रोज तणावग्रस्त. परीक्षा म्हणजे राक्षस... शिंदे पतिपत्नीस आपली मुलगी स्नेहास आपल्या विचार, स्वप्नांची बाहुली बनवण्याच्या नादात हे विसरतात की मुलीला स्वतःचा काही विचार, दिशा आहे... ती तिची म्हणून स्वतंत्र आहे. रुपाली-अजय वर्गमित्र. मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी होतं कळत नाही... ‘प्रेमासाठी सर्वकाही' ठरलं की विधिनिषेध संपतो. चोरीपण सत्कृत्य वाटण्याच्या वयात जीवनाची झालेली वाताहात समजून उमजत नाही अशी स्थिती. दहावीला मेरिटमध्ये असलेली प्रज्ञा अकरावीला नापास. YD... Year Down... Rest Year चं फॅड टाईमपास म्हणून चॅटिंग... Boy friend हवाच. त्याशिवाय आपण मॉडर्न नाही अशी वाढत जाणारी क्रेझ'. योगेश Hi Fi जगाचा शिकार, मौज, मस्ती फॅशनचं जीवन वाटतंय त्याला. अभय हा एकुलता. लाडानं अप्पलपोटा. मी... माझं... मला काय दुस-याचं? असा आत्मकेंद्री. घरी वाढणारी मुलगी. ती केव्हातरी कुणाची तरी बायको, सून म्हणून जाणार. तिला जबाबदार, कामसू बनवावं याचा विसर पडलेले आईवडील. अशी मुलगी माहेरी

प्रशस्ती/१०९